ओरोस (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील एका क्रशरवर सहकारी दोन कामगारांचा खून केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी संजय लोखंडे याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश गायकवाड यांनी फेटाळला. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केला. क्रशरवर कामगार असलेल्या संजय लोखंडे यांनी आपल्या दोन सहकारी कामगारांचा क्रशरवर दारूच्या नशेत खून केला होता. ही घटना 30 एप्रिल रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली होती. या गुन्ह्यात आरोपी संजय लोखंडे वर बी एन एस च्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपी लोखंडे याने दाखल केलेल्या जामीन अर्जाला सरकारी वकील रुपेश देसाई यांनी हरकत घेतली. आरोपी नाशिक जिल्ह्यातील असून परजिल्ह्यातील आरोपी लोखंडे हा न्यायालयीन सुनावणीस हजर राहणार नाही, फिर्यादी आणि साक्षीदार यांना आरोपिकडून धोका होऊ शकतो, गुन्हा गंभीर असून तपासावर आहे, आरोपिकडून पुराव्यात हस्तक्षेप होऊ शकतो,आरोपी विरोधात याआधी सातपूर पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल असून तो पुन्हा असा गुन्हा करू शकतो हे मुद्दे न्यायालयासमोर मांडत सरकारी वकील रुपेश देसाई यांनी आरोपीचा जामीन फेटाळण्याची मागणी केली. सरकारी वकील रुपेश देसाई यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा न्यायाधीश गायकवाड यांनी आरोपी संजय लोखंडे चा जामीन अर्ज फेटाळला.
दुहेरी खूनातील आरोपी संजय लोखंडे चा जामीन फेटाळला












