करूळ गगनबावडा घाटातील वाहतूक सुरू

अथक मेहनतीने कोसळलेली दरड हटवली

वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसाने सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास करूळ घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. सुमारे सात तासापेक्षा जास्त वेळ घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या घाटातून होणारी वाहतूक भुईबावडा व करूळ घाटातून वळवण्यात आली होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून तीन जेसीबीच्या सहाय्याने युद्धपातळीवर कोसळलेली दरड हटवून सायंकाळी चार वाजल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू केले आहे.
मात्र याठिकाणी आणखी दरड कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे रस्ता सुपरफास्ट झाला असला तरी दरडी कोसळण्याचा धोका मात्र कायम आहे

जिल्ह्यात गेले तीन चार दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. तर घाटमाथ्यावर सह्याद्रीपाट्यात अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसाने करूळ घाटात चेक  नाक्यापासून सुमारे ५ की. मी. अंतरावर दरडीचा मोठा भाग कोसळून रस्त्यावर आला. त्यामुळे दगड, मातीने पूर्ण रस्ता व्यापून गेला होता. ही माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे ठेकेदार वेल्हाळ कंपनी यांनी तातडीने जेसिबी लावून दरड हटविण्यास सुरवात केली. मात्र सकाळी पाऊस पडत असल्यामुळे कामात व्यत्यय येत होता. दरड मोठयाप्रमाणात पडलेली असल्यामुळे कंपनीने तीन जेसिबी लावून दरड हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु केले. या दरडीत मोठमोठे दगड सुद्धा रस्त्यावर आले होते. तब्बल सात तासानंतर वाहतूक सुरु करण्यात आली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच वैभववाडी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह घाटात जाऊन पाहणी केली. यावेळी करूळ पोलीस पाटील उदय कदम, महामार्ग पोलीस अमोल महाडिक, वेल्हाळ कंपनीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!