जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतल्याचा, पाल्य आणि पालक यांना सार्थ अभिमान वाटावा— कार्य. अभियंता राजेंद्र सावंत
आम्ही मुलांमध्ये गुणवत्ता निर्माण करतो.– केंद्रशाळा
जि. प. शाळा— माझी शाळा ! ही भावना वाढीस लागावी– स्नेहा सावंत
यानिमित्ताने शाळांच्या दुरावस्तेकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले
फोंडाघाट (प्रतिनिधी) : शाळेचा पहिला दिवस, आज फोंडाघाट पंचक्रोशीतील वाडी- वाडीवरील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा मधून, प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात संपन्न झाला. यामध्ये नवागतांसह, विद्यार्थी विद्यार्थी- विद्यार्थिनी आणि पालक महिला- पुरुष, ग्रामस्थ आणि शिक्षक वर्ग सहभागी झाले होते. सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण होते. बहुतांश शाळा रांगोळ्यांनी आणि स्वागताच्या सेल्फी पॉईंट्स नी सजल्या होत्या. सकाळी वाद्यांच्या आणि घोषणांच्या जयजयकारात प्रभात फेरीने प्रशालेच्या आवारात मुलामुलींचे आणि ग्रामस्थ पालकांचे आगमन झाले. त्यानंतर शिक्षकांनी स्वागत करून इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेतलेल्या मुला मुलींचे, आपल्या प्रशालेतील पहिले पाऊल कुंकूजलात भिजवून कागदावर उमटवले आणि पहिल्या दिवसाचे स्मरणचित्र पालकांना भेट दिले. त्यानंतर शाळेतील शिक्षकांनी प्रत्येक मुला-मुलींचे औक्षण करून गुलाब पुष्प देऊन कौतुक केले. उपस्थित मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर नवागतांना शालेय पुस्तके आणि गणवेश वाटप करण्यात आले.
जीवन शिक्षण विद्यामंदिर फोंडा केंद्र शाळा
या प्रवेशोत्सवाचे वेळी बोलताना, फोंडा सरपंच सौ संजना आग्रे यांनी,नवागतांचे स्वागत करताना त्यांना शुभेच्छा दिल्या आणि शैक्षणिक उठावात ग्रामपंचायती कडून सदैव सहकार्य लाभेल अशी ग्वाही दिली. जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता (बांधकाम) राजेंद्र सावंत यांनी,आपल्याला जि. प .शाळेमध्ये प्रवेश घेतल्याचा सार्थ अभिमान वाटावा असे शिक्षण प्रशालेत मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली व शुभेच्छा दिल्या. राजेश शिरोडकर त्यांनी मुलांचे कौतुक करताना,अधिकाऱ्यांकडे केंद्रशाळेच्या दुरुस्तीकडे लक्ष देऊन, पिण्याच्या पाण्यासाठी बोरवेल विहिरीची गरज लक्षात आणून दिली. शि.पा.संघाचे अध्यक्ष रुपेश रेवडेकर यांनी मुलांचे व शाळेतील शिक्षक वर्गाचे कौतुक करताना, असलेल्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले. पालक प्रतिनिधी शशिकला शितोळे यांनी– केंद्र शाळेत गुणवत्ता पाहून प्रवेश दिला जात नाही तर येथे विद्यार्थ्यांमध्ये सर्वंकश गुणवत्ता निर्माण केली जाते, असा गौरव पर विश्वास शिक्षकांप्रति व्यक्त केला. यावेळी वृंदा आग्रे,मुख्या. सृष्टी गुरव, रंजना पाटील, वेदांती नारकर,अंगणवाडी सेविका, पोषण आहार सेविका, ग्रामस्थ- पालक वर्ग आणि विद्यार्थी- विद्यार्थिनी उत्साहाने सहभागी झाले.
जि. प. शाळा – गांगोवाडी
या प्रवेशोत्सव प्रसंगी अंगणवाडी पर्यवेक्षिका स्नेहा सामंत यांनी, नवागतांचे स्वागत करून ” जि. प. ची प्राथमिक शाळा — माझी शाळा ” ही भावना प्रत्येक पालक आणि पाल्य यांनी जोपासली पाहिजे. इथे भौतिक सुविधांपेक्षा शैक्षणिक आणि दर्जेदार संस्कार- शिस्तीच्या मुशीतून आदर्श विद्यार्थी तयार होतील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी मुख्या.संजय सावंत,अध्यक्ष हेमंत फोंडेकर, संजना लाड, स्नेहलता पांचाळ, मानसी सावंत, प्रीती फोंडेक,र निलेश कडूलकर, मंगेश फोंडेकर, सहशिक्षिका दर्शना हुंबे, श्रीकृष्ण ठाणेकर, ग्रामस्थ, पालक वर्ग ,शाळा व्यवस्थापन समिती, शि.पा. संघ, इत्यादी उपस्थित होते.











