लोरे गावात ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमाची सुरवात

शेतकऱ्यांचे कष्ट आणि खर्च कमी करून उत्पन्न वाढविणे हे विद्यापीठाचे यामागील उद्दिष्ट !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : कृषि महाविद्यालय, दापोली द्वारे ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत कणकवली येथे आलेल्या विद्यार्थ्यांच्या ‘कृषिसंजिवनी’ गटाने लोरे नं. १ या गावातील नरामवाडी येथे शेतकऱ्यांसाठी विविध प्रात्यक्षिके घेतली.’शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ या म्हणीची कास धरत, मीठ द्रावण, बुरशीनाशक तसेच जैविक खते यांची बीजप्रक्रिया करण्याचे महत्त्व समजावून देऊन, शास्त्रशुद्ध प्रक्रिया शेतकऱ्यांना दाखविण्यात आली. ह्यामध्ये स्त्रियांनी व पुरुषांनी मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शवला.कृषि महाविद्यालय, दापोलीचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मकरंद जोशी, कृषि संशोधन केंद्र, फोंडाघाटचे प्रमुख डॉ. विजय शेट्ये, प्रा. डॉ. उदयकुमार पेठे, डॉ. विरेश चव्हाण, डॉ. परेश पोटफोडे, कृषि पर्यवेक्षक डॉ. देवू पवार, तांत्रिक अधिकारी डॉ. प्रविण झगडे, कृषि सहाय्यक रसाळ व इतर विविध विषय विशेषज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. विभव सिनकर, रोहन वेळीप, अपुर्व आयनारकर, ॲरोन डायस, साईराज गावकर, प्रजय वराडकर, पियुष वाजे, सार्थक शिर्के व सिद्धार्थ जाधव हे विद्यार्थी सदर उपक्रमात सहभागी झाले होते.

ग्रामीण जागृती कार्यानुभव ह्या कार्यक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांना ५ महिन्यांच्या कालावधीसाठी विविध गावांमध्ये पाठविले जाते. यामध्ये विद्यार्थी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन शेती संबंधित व प्रत्यक्ष शेतावर येणाऱ्या अडचणी याबाबत माहीती गोळा करतात. ज्यातून विद्यापीठाच्या संशोधन कार्यास मदत होते. याबरोबरच विविध प्रात्यक्षिके घेऊन विद्यापीठाने केलेल्या शिफारशी व पिकांचे वाण लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम देखील करतात. हा कार्यक्रम ‘शेतकऱ्यांचे कष्ट व खर्च कमी करून त्यांचे उत्पन्न वाढवणे’ ह्या विद्यापीठाच्या उद्दीष्टांना चालना देतो.

error: Content is protected !!