वैभववाडी बाजारपेठेतील नागरिकांनी गाडीतील पर्यटकांची केली धुलाई
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी शहरात एका स्थानिक पदाधिकारी मोटारसायकल स्वाराला मागून पुणे येथील पर्यटकांच्या चार चाकी वाहनाने धडक दिली. याचा जाब विचारल्याचा राग चार चाकी वाहानातील मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुण पर्यटकांना आला. त्यांनी स्थानिक मोटार सायकल स्वारावर हात उचलला. त्यामुळे संतप्त झालेल्या बाजारपेठेतील नागरिकांनी त्या गाडीतील पर्यटकांची चांगली धुलाई केली यामुळे शहरात काहीवेळ वाहतूकीची कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्या चार चाकी वाहनातील युवकांना पोलीस ठाणे आणले. त्यांना समज देऊन सोडण्यात आले. ही घटना बुधवारी सायंकाळी ५. ४५ वाजण्याच्या सुमारास घडली.
सध्या तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम वैभववाडी शहरातून सुरू आहे. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी होत आहे. बुधवारी वैभववाडी शहरातील आठवडे बाजार असल्यामुळे शहरात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असते. सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास स्थानिक पदाधिकारी आपल्या मोटरसायकल वरून वैभववाडी शहरातून आपल्या घरी जात होते. दरम्यान त्यांच्या मागून फोंड्याहून वैभववाडीच्या दिशेने पुणे येथील पर्यटकांची गाडी येत होती. या गाडीने स्थानिक पदाधिकाऱ्याच्या मोटार सायकलला या चार चाकी वाहनाने मागून धडक दिली. याबाबत मोटरसायकल स्वरांनी त्या चालकाला जाब विचारला. मात्र आपली काही चूक नसल्याच्या अविर्भावात या गाडीतील मदधुंद अवस्थेत असलेले युवक या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या अंगावर गेले. त्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. स्थानिक पदाधिकाऱ्याला पाहिल्यानंतर बाजारपेठेतील नागरिकांनी त्या पर्यटकांना चांगला झोप दिला व याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करीत त्या युवकांना पोलीस ठाण्यात आणले. त्या ठिकाणी झालेल्या प्रकाराबाबत त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांची माफी मागितल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला. मात्र यामुळे शहरात काही वेळ वाहतुकीची कोंडी झाल्यामुळे शहरात सर्वत्र या प्रकरणाची चर्चा सुरू होती..












