रेडी – रेवस मार्गावरील वरचेमाड ते मोचेमाड दरम्यान भुमिगत विद्यूत वाहीनीचे चर तातडीने बुजवा —

मोचेमाड ग्रामस्थ व भाजपा ची मागणी

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : तालुक्यातील रेडी – रेवस मार्गावर उभादांडा वरचेमाड ते मोचेमाड दरम्यान टाकण्यात आलेल्या भुमिगत विद्युत वाहिनीमुळे वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे . ठेकेदाराने सदर काम निकृष्ट पद्धतीत केल्यामुळे पावसाच्या पाण्यामुळे चरातील सर्व माती रस्त्यावर आली, त्यामुळे वाहतुकीस रस्ता बंद झाला . तसेच भुमिगत विद्युत वाहीनी टाकल्यावर सदरचे चर बोल्डर टाकुन बुजवीने आवश्यक असताना फक्त माती टाकुन थुकपट्टी करण्यात आलेली आहे . भुमिगत लाईन टाकताना रस्त्याच्या कडेला असलेले गटर हे बुजल्यामुळे डोंगर उतारावरुन येणारे पाणी त्या चरात जाऊन त्या चरातील माती वारंवार रस्त्यावर येत असल्याने वाहतुकीस अडथळा येत आहे . तसेच चरातील माती वाहुन गेल्यामुळे ठिकठिकाणी विद्युत वाहीनी रस्त्यावर आली आहे . त्यामुळे कोणत्याही क्षणी धोका निर्माण होऊ शकतो .

सदर बाब गंभीर असतानासुद्धा ठेकेदार व महावितरण चे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत . त्यामुळेच मोचेमाड ग्रामस्थ व भाजपा पदाधिकाऱ्यांनी महावितरण कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला . तसेच सदर गंभीर प्रश्नी तातडीने दखल घ्यावी , अशी मागणी केली . तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना सदर घटनेचे गांभीर्य समजावे यासाठी तातडीने या बाबतचा अहवाल सादर करावा , अशी मागणी केली . तसेच ठेकेदाराकडून सदर झालेले निकृष्ट काम दुरुस्त करून घेत सदर रस्ता वाहतुकीस योग्य करावा अशी आग्रही मागणी केली . तसेच दुरुस्तीचे काम लवकरात लवकर सुरु न केल्यास ग्रामस्थांना सोबत घेऊन महावितरण कार्यालया समोर आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजपा शिष्टमंडळाने दिला .

यावेळी मोचेमाड ग्रामस्थ सत्यवान पालव , मोहन कोचरेकर , राजाराम तांडेल , नारायण गावडे , उदय गावडे , भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष पपु परब , मा.तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , मच्छिमार नेते दादा केळुसकर , युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर व वैभव होडावडेकर , अल्पसंख्याक सेलचे सायमन आल्मेडा इत्यादी उपस्थित होते .

error: Content is protected !!