नेरूर येथे ‘शाश्वत शेतीतून महिलांची आर्थिक उन्नती’ या जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन

कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि कोरो इंडिया यांचा संयुक्त उपक्रम

कुडाळ (प्रतिनिधी) : नेरूर कार्यक्षेत्रातील नेरूर सायचे टेंम्ब येथे कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि कोरो इंडिया याच्या संयुक्त विद्यमाने नेरूर गावातील शेतकरी महिला, ग्रामस्थ यांच्यासाठी ‘शाश्वत शेतीतून महिलांची आर्थिक उन्नती’ हा जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कोरो इंडिया यांच्या ग्रास रूट नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत जनसंवाद कार्यक्रमासाठी नेरूर देउळवाडा ग्रामपंचायत उपसरपंच दत्ताराम म्हाडदळकर, मंडळ कृषी अधिकारी विजय घोंगे, उद्योजिका प्राची धुरी, कृषी अभ्यासक हनुमंत गवस, नेरूर पोलिस पाटील श्वेता मेस्त्री, ग्रा. सदस्य मंजुनाथ फडके, संस्था प्रमुख शशिकांत कासले, ग्रामसंघ अध्यक्ष मेघा पवार, ग्रामसंघ सचिव प्राजक्ता नांदोस्कर, CRP उषा नेरुरकर, कोषाध्यक्ष मनिषा मेस्त्री, प्रगतशील शेतकरी उमेश नेरुरकर, सत्यवान भगत, समीर शिर्के आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शाहू महाराज व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून तसेच मान्यवर मंडळींचे सुपारी रोप देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करताना संस्थाप्रमुख शशिकांत कासले यांनी संस्थेच्या ग्रामविकासात्मक कार्याची सविस्तर माहिती दिली. तसेच कोरो इंडिया या संस्थेच्या माध्यमातून नेरूर गावात केलेल्या कामाची थोडक्यात माहिती त्यांनी यावेळी दिली. गावचे उपसरपंच यांनी या कार्यक्रमाच्या अनुशंगाने असे कार्यक्रम संपूर्ण नेरूर गावातील शेतकरी मंडळींना मिळावे, अशी आशा व्यक्त केली. त्यानंतर मंडळ कृषी अधिकारी विजय घोंगे यांनी कृषी विभाग स्तरावरून राबविण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची माहिती दिली तसेच कृषी विषयक मार्गदर्शन केले. प्राची धुरी यांनी शेतीपूरक व्यवसाय, मार्केटिंग, पॅकेजिंग आणि व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन केले तर हनुमंत गवस यांनी विषमुक्त शेती अनुषंगाने हळद लागवडीचे व्यवस्थापना बरोबरच मोठ्या प्रमाणावर केल्या जाणाऱ्या भात पीक लागवड, कीड नियंत्रण आणि उत्पन्न वाढीसाठी सखोल असे मार्गदर्शन केले. यावेळी साथी गटाबरोबर गावातील इतर महिलांचा सहभाग चांगल्या प्रकारे लाभला. यामध्ये गजानन स्वयंसहायता महिला समूह, खवनोबा सातेरी स्वयंसहायता महिला समूह, जय सद्गुरू स्वयंसहायता महिला समूह, कोलडोंगर स्वयंसहायता महिला समूह, करुणा स्वयंसहायता महिला समूह गटांतील महिलांनी सहभाग घेतला होता.

कार्यक्रमाच्या समारोपावेळी उपस्थित महिला गटांना हळद लागवडीसाठी बियाणे वाटप करण्यात आले. जेणेकरून महिला शेती पूरक उद्योगाच्या अनुषंगाने लघु व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षक होण्यासाठी अश्याप्रकारे पहिले पाऊल टाकण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी प्राजक्ता नांदोस्कर यांनी उपस्थित मान्यवर मंडळी व उपस्थित शेतकरी व महिलांचे आभार मानले. नेरूर गावात कोरो संस्था व कोकण संस्थेच्या सहकार्याने अशा शेतीपूरक कार्यक्रमांचे आयोजन करू, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामपंचायत नेरूरचे कर्मचारी, उर्मिला नेरुरकर, गुरुप्रसाद नेरुरकर, CRP ताई यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

error: Content is protected !!