रुग्णवाहिका चालकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : १०८ रुग्णवाहिका चालकांना
समान काम समान वेतन या तत्त्वावर वेतन व भत्ते अदा करण्यात यावेत, तसेच आरोग्य आणि सोसायटीचे कर्मचारी म्हणून मान्यता देण्यात यावी. यासह विविध मागण्यांसाठी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १०८ रुग्णवाहिका चालकानी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन केले
राज्यातील १०८ रुग्णवाहिका वाहन चालक गेल्या अनेक वर्षापासून अत्यंत महत्त्वपूर्ण सेवा देत आहेत. त्यांना अनेक समस्या भेडसावत आहेत या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मुंबई आझाद मैदान येथे १३ मे २०२५ रोजी आंदोलन करून निवेदन सादर केले होते. यावेळी १०८ वाहन चालकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेऊन न्याय देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आश्वासनाची पूर्तता अद्याप झालेली नाही. १०८ रुग्णवाहीका चालकांच्या मागण्यांबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही शासन स्तरावर किंवा सेवा पुरवठादार यांच्याकडून झालेली नाही. त्यामुळे चालकांमध्ये तीव्र असंतोष आहे. १०८ रुग्णवाहिका वाहन चालक गेली अनेक वर्ष अल्प वेतनावर काम करत आहेत. रुग्णवाहिकांची स्थिती ही अत्यंत वाईट आहे. वाहन चालकांकडून ज्यादा काम करून घेतले जाते, परंतु त्यांना अधिकचा कुठलाही मोबदला दिला जात नाही. याबाबत शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधूनही त्याला कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर आज संपूर्ण राज्यभरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १०८ रुग्णवाहिका चालकानी काम बंद आंदोलन पुकारून जिल्हाधिकारी कार्यालयात समोर लक्षवेधी आंदोलन सुरू केले आहे.
१०८ ही रुग्णवाहिका सेवा अत्यावश्यक सेवा आहे. त्यामुळे मागण्यांची पूर्तता झाली नसली तरी वाहन चालक अविरत सेवा बजावत आहेत. रुग्णांची गैरसोय होऊ नये, रुग्णांचा जीव वाचावा .यासाठी रात्रंदिवस कार्यरत राहूनही शासन १०८ रुग्णवाहिका चालकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे ना विलाज म्हणून काम बंद आंदोलन करावे लागले असल्याचे आंदोलन करणाऱ्या वाहन चालकांचे म्हणणे आहे . तरी शासनाने याचा विचार करावा व तातडीने मागण्यांबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२ कार्यरत असलेल्या १०८ रुग्णवाहिकेद्वारे सेवा पुरवणारे जिल्ह्यातील २८ वाहन चालक या आंदोलनात सहभागी झाले आहेत. यामध्ये १०८ रुग्ण वाहिका चालक यूनियन चे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष तुकाराम पाटील , सचिन सावंत , बाळकृष्ण कोरगावकर, रोहित देसाई , स्वप्निल गाडगे,एकनाथ देसाई,आदिसह जिल्ह्यातील वाहन चालक सहभागी झाले आहेत .
प्रमुख मागण्या
शासकीय सेवेत कायम असलेल्या वाहन चालकाप्रमाणे समान काम समान वेतन व भत्ते अदा करण्यात यावेत, १०८ वाहन चालकांना आरोग्य आणि सोसायटीचे कर्मचारी म्हणून मान्यता देण्यात यावी, मोटर वाहतूक कामगार अधिनियम १९६१ नुसार ८ तासापेक्षा जादा कामाचा मोबदला सामान्य ८ तासाच्या वेतनाच्या दुप्पट दराने देण्यात यावा, कायद्यानुसार लागू असलेल्या सर्व प्रकारच्या पगारी रजा नियमित देण्यात याव्यात, वार्षिक पगाराच्या ८.३३ टक्के बोनस अदा करण्यात यावा,शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे मूळ वेतन व महागाई भत्त्यात वार्षिक वाढ देण्यात यावी, धुलाई भत्ता मासिक २ हजार रुपये अदा करण्यात यावा, वेतन दर महा १० तारीख च्या आत देण्यात यावे, ५ वर्षे सेवापूर्ण झालेल्या चालकांना कायद्यानुसार ग्रॅज्युएटी देण्यात यावी, रुग्णवाहिका चालकांचा गणवेश पांढरा शर्ट व निळी पॅन्ट करण्यात यावी, शासकीय नोकर भरतीमध्ये विशेष आरक्षण देण्यात यावे, जिल्ह्यात कार्यरत असलेल्या रुग्णवाहिका जीर्ण झालेल्या आहेत तरी नवीन रुग्णवाहिका सेवेत दाखल कराव्यात, रुग्णवाहिकांची देखभाल दुरुस्ती नियमित व वेळेत करण्यात यावी, यासह विविध मागण्या या आंदोलनाद्वारे करण्यात आले आहेत











