आचरा (प्रतिनिधी) : कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून सिंधुदुर्गचे सुपुत्र सुनील नारकर यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
सुरुवातीला १९९७ मध्ये ते कोकण रेल्वेमध्ये रत्नागिरीत क्षेत्रीय ट्रॅफिक व्यवस्थापक पदावरती रुजू झाले होते. त्यानंतर मडगावमध्ये वरिष्ठ क्षेत्रीय वाहतूक व्यवस्थापक पदावरती कार्यरत होते. मडगाववरून बेलापूर मुख्यालयामध्ये मुख्य वाणिज्य प्रबंधक म्हणून यशस्वी कामगिरी बजावली होती आणि आता सुनील नारकर त्यांना पदोन्नती मिळून त्यांची कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
सुनील नारकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील पियाळी गावचे सुपुत्र आहेत. त्यांचे पाचवीपासून बारावीपर्यंतचे शिक्षण कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक विद्यालयामध्ये झाले आहे. कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या सन १९९०-९२ च्या दहावी-बारावीच्या बॅचमधील याराना मित्र परिवाराचे सक्रिय सदस्य आहेत. त्यांना सामाजिक कार्याची देखील विशेष आवड आहे. तसेच त्यांचा मित्र परिवार देखील खूप मोठा आहे. ते आपल्या वाढदिवसाच्या दिवशी कॅन्सर पिडीत लहान मुलांना कोकण रेल्वेतून मुंबई ते गोवा अशी सफर करून आणतात तसेच त्यांची सर्व व्यवस्था करतात आणि त्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पसरविण्याचा प्रयत्न करीत असतात. आपल्या मुळ जन्मभूमी गावा विषयी आणि शिक्षण घेतलेल्या शाळेविषयी तसेच गुरुजणांविषयी खूप अभिमान व आदर आहे. कोकणातील या सुपुत्राची कोकण रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी या महत्त्वाच्या पदांवरती नियुक्ती झाली त्याबद्दल त्यांच्या जन्मगावी पियाळी तसेच कासार्डे परिसरातून अभिनंदन वर्षाव होत आहे.












