पंचायत समिती, कृषी विभाग आणि ग्रामपंचायत करूळ यांमार्फत करूळ येथे कृषी मेळाव्याचे आयोजन
वैभववाडी (प्रतिनिधी) : शेतकऱ्याचे जीवनमान, आर्थिकस्तर उंचावायचे असेल तर शेतीमध्ये व्यावसायिक दृष्टीकोन आला पाहिजे. शेतीतून आपली गरज भागवून त्यातून उत्पन्न मिळाले पाहिजे. यासाठी योग्य नियोजन करून शेती केली पाहिजे. वैभववाडी तालुक्यात अनेक छोटी मोठी धरणे आहेत. मात्र तालुक्यातील सिंचनाखालील क्षेत्र खूपच कमी आहे. या पाण्याचा वापर करून येथील शेतकऱ्यांनी शेतीतून समृद्धी निर्माण करावी, असे आवाहन तहसीलदार सूर्यकांत पाटील यांनी केले. पंचायत समिती वैभववाडी व महाराष्ट्र शासन कृषी विभाग वैभववाडी ग्रामपंचायत करूळ यांच्या संयुक्त विद्यमाने काल वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त करूळ येथे कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानावरून तहसीलदार पाटील बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले, पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, अधिकारी उमाकांत पाटील, तालुका कृषी अधिकारी निरंजन देशमुख, सरपंच नरेंद्र कोलते, डॉ. प्रसाद देवधर, प्रा. विवेक कदम, बाळा सुतार, प्रगतशील शेतकरी मंगेश कदम, महेश संसारे, विलास देसाई, उदय कदम, सुरेश सुतार, मंडल कृषी अधिकारी मंडावले, मुख्याध्यापक घाडगे, कृषी अधिकारी कांता जाधव, प्रभाकर जाधव, अरुण कदम, उपसरपंच सचिन कोलते यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर म्हणाले, सामाजिक व्यवस्थेने राजकीय व्यवस्थेला कधीतरी सांगायला हवे त्यांनी नेमके काय करायला हवे. सगळ्यात जास्त दुःख हे शेतकरी भोगत असतो. मात्र ते कुठेही दाखवले जात नाही. तो उत्पादक आहे. शेतकरी जगला तर तुम्ही जगाल त्यामुळे त्याचा भाव करू नका. बाजारात काय विकले जात आहे, काय शाश्वत आहे, ते पिकवण्याचा प्रयत्न करायला हवा. तरच आपण पुढे जाणार आहोत. आपल्या गरजा भागतील इतकं तरी आपण पिकवतो का? माझ्या घराच्या गरजा काय आहेत, हे ओळखून ते पिकवण्याचा प्रयत्न करायला हवा. आपण पिकवलेले उत्पादन विकण्याची आपल्याला लाज वाटता कामा नये, असेही त्यांनी सांगितले. यावेळी प्रगतशील शेतकरी मंगेश कदम यांचा शासनाचा शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच तालुक्यात भात पीक स्पर्धेतील विजेते ऍड. अजितसिंह काळे, सुनील पवार, नवलू झोरे या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे उत्कृष्ट काम केल्याबद्दल ग्रामसेवक सचिन कांबळे, सचिन चव्हाण, रवींद्र गोसावी यांचा तसेच कृषी सहाय्यक साईप्रसाद तेली, चंद्रशेखर कदम, स्नेहा गेडाम, दीपक म्हसेकर व रोजगार सेवक वैष्णवी नकाशे, विनायक गुरव, दीपक सरवणकर यांचा उत्कृष्ट काम केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. आपत्ती काळात नेहमीच धावून जाणाऱ्या करूळ येथील सह्याद्री रक्षक टीमचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात भव्य वृक्ष दिंडीने करण्यात आली. यामध्ये गावातील वारकरी, शेतकरी, विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. रानभाजी प्रदर्शन मांडण्यात आले होते. रान भाज्यांचे आहारातील महत्व, त्याचे औषधी गुणधर्म सांगणारी माहिती कृषी महाविद्यालय सांगुळवाडीचे विद्यार्थी सांगत होते. कृषी दिनाचे औचित्य साधून करूळ येथे तहसीलदार सूर्यकांत पाटील, गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले व अधिकारी कर्मचारी यांनी औत व पॉवर ट्रिलर हाती धरला. तर भात लावणीचासुद्धा आनंद घेतला.










