वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांची आरक्षण सोडत मंगळवार १५ जुलै रोजी सकाळी ठिक ११. ०० वाजता तहसीलदार कार्यालय वैभववाडी केली जाणार असल्याची माहिती तहसीलदार सूर्यकांत पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिली आहे. ग्रामपंचायतींच्या सन २०२५ ते २०३० या कालावधीत होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेऊन सरपंच आरक्षण निश्चित केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच/उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ च्या नियम २-अ (१) (२) नुसार तालुक्यातील सरपंच आरक्षित करावयाची आहेत. वैभववाडी तालुक्यातील ३४ ग्रामपंचायत सरपंच पदाचे प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चित केले जाणार आहे. सरपंच पदाच्या प्रवर्गनिहाय आरक्षणाची संख्या पुढील प्रमाणे असून अनु. जातीसाठी आरक्षित पदे प्रवर्ग १, महिला २, अनु. जमातीसाठी आरक्षित पदे प्रवर्ग ०, महिला ०, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित पदे प्रवर्ग ४, महिला ५ व खुला प्रवर्गामध्ये ११, महिला ११ अशाप्रकारे सरपंच पदाचे आरक्षण सोडत पध्दतीने निश्चित केले जाणार आहे. तरी वैभववाडी तालुक्यातील सर्व संबंधित सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनी नोंद घेऊन वरील पदाचे आरक्षण कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित राहण्याचे आवाहन प् तहसीलदार पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे. गावाच्या सरपंच, उपसरपंच पदासाठी इच्छुक उमेदवारांचे या आरक्षण सोडतीकडे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे या आरक्षणात कोणाला सरपंच पदासाठी उमेदवारी करण्याची संधी मिळणार हे पाहणे औसूक्याचे ठरणार आहे.
वैभववाडी तालुक्यातील ३४ ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत १५ जुलै रोजी











