नूतन अपर पोलीस अधीक्षक नयोनी साटम यांचे जिल्हावासीयांना आवाहन
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : आपला सिंधुदुर्ग जिल्हा शांतताप्रिय आहे. येथील क्राईम रेशो खूपच कमी आहे. ही शांतता कायम राहण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी सुध्दा कायदा हातात घेवू नये. अन्याय होत असल्यास पोलिसांचे सहकार्य घ्यावे, असे आवाहन सिंधुदुर्ग कन्या तथा नूतन अपर पोलीस अधीक्षक नयोनी साटम यांनी जिल्ह्यातील जनतेला केले आहे.
अपर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले यांची पुणे येथे उपायुक्त म्हणून बदली झाल्यानंतर शासनाने त्यांच्या जागी नयोनी साटम यांची नियुक्ती केली होती. नयोनी साटम यांनी गुरुवारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. शुक्रवारी जिल्हा मुख्यालयातील पत्रकारांनी त्यांची भेट घेवून त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी गप्पा मारताना आपण या जिल्ह्याच्या मूळ रहिवाशी आहोत. हा जिल्हा खूपच शांत आहे. थेट चंद्रपूर ते सिंधुदुर्ग आपली पदोन्नतीने बदली झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात डीवायएसपी असताना तेथे जमीन वादाच्या शुल्लक कारणावरून खून झालेले आपण पाहिले आहेत. मात्र, सिंधुदुर्गात कायदा पाळणारी, सुशिक्षित जनता असल्याने येथील क्राईम रेशो कमी आहे.
भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होवू घातल्या आहेत. या निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी नागरिकांनी शांतता पाळण्यासाठी आपले प्राधान्य राहणार आहे. आपण जिल्ह्याची मूळ रहिवाशी असले तरी गणपतीला पिसेकामते येथे येत होते. परंतु दरवर्षी येत नसायची. त्यामुळे जिल्ह्याची तेवढी माहिती नाही. कालच आपण पदभार स्विकारला आहे. परिणामी आपल्याला प्रथमतः जिल्हा समजून घ्यायचा आहे, असे यावेळी नूतन अपर पोलीस अधीक्षक नयोनी साटम यांनी बोलताना सांगितले.










