ग्राहक मंचाच्या आदेशाचे अपालन भोवले!

परशुराम मेस्त्री याला 2 वर्षाची साध्या कैदेची शिक्षा

ॲड. गायत्री उर्फ राखी मालवणकर यांनी केला यशस्वी युक्तिवाद

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : उज्वला वरस्कर यांचेकडून परशुराम एकनाथ मेस्त्री यांनी 3 लाकडी चौकट व 3 सागवाणी दरवाजे बनवून देण्यासाठी रक्कम रू. 63,000/- इतकी रक्कम स्विकारली होती. मात्र रक्कम स्विकारून देखील तक्रारदार वरस्कर यांना 3 लाकडी चौकट व 3 सागवाणी दरवाजे बनवून दिले नाहीत, म्हणून तक्रारदार उज्वला वरस्कर यांनी परशुराम एकनाथ मेस्त्री यांचे विरूध्द ग्राहक मंचाकडे आपली तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारीचे कामी ग्राहक मंचाने परशुराम एकनाथ मेस्त्री यांचेविरूध्द आदेश करून तक्रारदार हिचेकडून घेतलेली रक्कम 63,000/- अदा करण्याचे व सदर रक्कमेवर तक्रार दाखल झाल्यापासून पूर्ण रक्कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज अदा करणेबाबत देखील आदेश केला. तसेच नुकसान भरपाईपोटी रू. 25,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रू. 15,000/- अशी रक्कम तक्रारदार हिस देणेबाबत आदेश केला होता व सदर आदेशाचे पालन निकालापासून ४५ दिवसांच्या मुदतीत करणेबाबत आदेश पारित केला होता. त्यानंतर देखील विरूध्दपक्ष परशुराम एकनाथ मेस्त्री याने तक्रारदार उज्वला वरस्कर हिस मे. मंचाच्या आदेशाप्रमाणे मुदतीत रक्कम न दिल्याने तक्रारदार उज्वला वरस्कर हिने सदरची रक्कम वसूल होऊन मिळणेकरीता वि.प. परशुराम एकनाथ मेस्त्री याचे विरूध्द ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्या कलम 71 व 72 अन्वये दाद मागितली होती व दरखास्त व फौजदारी फिर्याद दाखल केली होती. मात्र सदर दरखास्तीच्या व फौजदारी फिर्यादीच्या सुनावणीस देखील विरूध्द पक्ष परशुराम एकनाथ मेस्त्री हा वारंवार गैरहजर राहिला. तसेच त्याचे विरूध्द नाँन बेलेबल वाँरंट असूनही मे. कोर्टात हजर रहाण्यास टाळाटाळ केली. सबब, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 392(6) आणि 392(7) अन्वये आणि Sharad Jethalal Salva Vis State of Gujrat, Cr.M.A.NO-19862/2015 या प्रकरणामध्ये मा. गुजरात उच्च न्यायालयाने पारित केलेल्या न्यायनिर्णयातील निष्कर्षाच्या आधारे आरोपीच्या गैरहजेरीमध्ये आरोपीस शिक्षा सुनाविण्याचा आदेश सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष इंदुमती मलुष्टे व सदस्य योगेश खाडीलकर यांनी पारित करण्यात केला. तसेच या आदेशाचे अंमलबजावणीकरिता आरोपी परशुराम एकनाथ मेस्त्री याच्या विरोधात अटक वॉरंट पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांचेमार्फत कणकवली पोलीस ठाण्यामध्ये पाठविण्यात येऊन परशुराम एकनाथ मेस्त्री यांस जिल्हा कारागृहात पाठविण्यात आले आहे.

प्रस्तुत फिर्यादीचे कामी फिर्यादीचेवतीने ॲड. गायत्री उर्फ राखी मालवणकर, कणकवली यांनी काम पाहिले.

error: Content is protected !!