चोरीस गेलेली मूर्ती सापडल्याचे पोलिसांना कळविले म्हणून वॉचमन वर राग
कणकवली (प्रतिनिधी) : जानवली कृष्णनगरी येथील चोरीस गेलेली कथित स्वयंभू दत्तमूर्ती पुन्हा सापडल्याचे पोलिसांना का सांगितले अशी विचारणा करून दत्तमंदिराचे मालक मधुकर रामचंद्र मोहिते हे अंगावर धावून गेल्याची तक्रार कृष्णनगरी हौसिंग सोसायटीचा वॉचमन नारायण पदु जंगले याने कणकवली पोलीस ठाण्यात दिली. जंगले याच्या तक्रारी वरून मधुकर मोहिते विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. जानवली कृष्णनगरी हौसिंग सोसायटी मध्ये असलेल्या मधुकर मोहिते यांच्या मालकीच्या दत्तमंदिरातील कथित स्वयंभू दत्तमूर्तीची 5 जुलै रोजी मध्यरात्री चोरी झाल्याची फिर्याद कणकवली पोलीस ठाण्यात दाखल आहे. चोरीस गेलेल्या दत्तमूर्ती चा तपास कणकवली पोलीस आणि नंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा करत असतानाच अचानक 10 जुलै रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कृष्णनगरी हौसिंग सोसायटी चे वॉचमन नारायण जंगले यांना दत्तमंदिरानजीक सदर मूर्ती पिशवीवर ठेवलेली आढळून आली. जंगले यांनी चोरीस गेलेली दत्तमूर्ती सापडून आली असल्याबाबत कणकवली पोलिसांना माहिती दिली. याचा राग मनात ठेवून मूर्ती सापडल्याचे पोलिसांना का सांगितलेस अशी विचारणा करत मधुकर मोहिते आपल्या अंगावर धावून आल्याची तक्रार वॉचमन जंगले यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिली. जंगले यांच्या तक्रारी वरून मधुकर मोहिते विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










