सभेला पालकांचा उस्फुर्त प्रतिसाद
खारेपाटण (प्रतिनिधी) : राज्यातील मॉडेल स्कूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं. १ या शाळेतील पालकांची शैशणिक वर्ष सन २०२५-२६ मधील पहिली पालक सभा नुकतीच शाळेच्या सभागृहात शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष प्राप्ती कट्टी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेला पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तर या सभेला शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष संतोष पाटणकर, समितीच्या विद्यमान उपाध्यक्ष प्रियंका गुरव, समिती सदस्य मंगेश ब्रम्हदंडे, संध्या पोरे, दीक्षा पाटणकर, उमेश गुरव, शाळेच्या पालक व ग्रामपंचायत सदस्य अस्ताली पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी शाळेचे उच्चश्रेणी केंद्र मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांनी उपस्थित मान्यवर समिती पदाधिकारी व सदस्य तसेच पालकांचे स्वागत करून सभेला सुरवात केली. यावेळी शिष्यवृत्ती, नवोदय तसेच एस टी एस सारख्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक सभेत मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी चालू शैशणीक वर्षातील शालेय उपक्रम नियोजन व स्पर्धा परीक्षेबाबत तसेच शालेय परीक्षेबाबत शाळेचे मुख्याध्यापक श्रावणकर यांनी सर्व पालकांना विस्तृत महिती दिली. तर सदर पालक सभेत सखी सावित्री समिती, महिला तक्रार निवारण समिती व विद्यार्थी सुरक्षा समिती गठीत करण्यात आली. यावेळी पालकांनी पालक सभेच्या चर्चेत सहभाग घेऊन विविध शैशणिक प्रश्नावर शिक्षकांशी संवाद साधला. तर काही सूचना सुचविल्या. शेवटी शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांनी सभा यशस्वी केल्याबद्दल उपस्थित सर्व पालकांचे आभार मानून सभा संपल्याचे जाहीर केले.











