दत्त विद्या मंदिर वैभववाडीची माजी विद्यार्थिनी श्रुती घोडके हिची प्रेरणादायी शैक्षणिक झेप
वैभववाडी (प्रतिनिधी) : दत्त विद्या मंदिर वैभववाडी या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक मराठी शाळेत शिकलेली विदयार्थीनी श्रुती संजीवनी संदीप घोडके हिने भारत सरकारच्या आयआयटी पदव्युत्तर मास्तर ऑफ सायन्स ही पदवी संपादन केली आहे. मराठी माध्यमाच्या शाळांना कमी लेखणाऱ्याना पालक व विद्यार्थ्यांनी यातून बोध घेण्यासारखी तीची उज्वल कामगिरी आहे.
श्रुती घोडके ही विदयार्थ्यांनी सन २००५ – २००६ या शैक्षणिक वर्षात वैभववाडी शहरातील दत्त मंदिर या प्राथमिक मराठी शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले आहे.पुढे जाऊन शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरी प्रेरणादायी व कौतुकास्पद ठरली आहे. तिचे वडील राजापूर स्थित रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात तर आई आचिर्णे येथील विद्यालयात पूर्ण दिवस सेवेत कार्यरत होते. श्रुतीने मराठी शाळेत प्रवेश घेतला त्यानंतर पालकांच्या बदलीच्या नोकरीनुसार पनवेल येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके मराठी विद्यालयात माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. दहावीमध्ये तिला ९६ टक्के मार्क मिळून दुसरा क्रमांक पटकावला. शालेय जीवनात आय.पी.एम. स्कॉलरशिप, संस्कृत परीक्षेतही तिने प्राविण्य प्राप्त केले. त्यानंतरही श्रुतीच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावत गेला. मुंबई विद्यापीठ अंतर्गत नवी मुंबईच्या फादर एग्नल या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये श्रेष्ठ श्रेणीत बी टेक पदवी संपादन केली. तेवढ्यावरही न थांबता चिकाटीने व जिद्दीने पदव्युत्तर शिक्षणासाठी आवश्यक पात्रता परीक्षेत यश संपादन केले व त्याच रँकनुसार “भारत सरकारच्या” जवळपास तीन भारतीय प्रौदौद्योगिकी संस्थान (IIT) मध्ये तिला प्रवेशाचे द्वार खुले झाले. त्यापैकी तिच्या संशोधन क्षेत्रातील अभिरुचीनुसार ऐतिहासिक शहर इंदोर आयआयटी कॅम्पस निश्चित करून अतिशय मेहनतीने, संघर्षाने अभ्यास करून व त्याच दरम्यान ज्युनिअर विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम करूनही अतिशय कमी वेळात निर्धारित संशोधन कार्याचे लक्ष पूर्ण केले तिच्या या चढत्या शैक्षणिक आलेखाचा, दर्जेदार संशोधनाचा प्रभाव म्हणून भारत सरकारच्या आयआयटी पदव्युत्तर मास्टर ऑफ सायन्स पदवीपूर्वीच तिला अमेरिका स्थित बहुराष्ट्रीय कंपनीने सीनियर इंजिनियर म्हणून ग्रेटर नोएडा येथे पोस्टिंग दिले आहे . नुकताच अनेक संशोधकांच्या उपस्थितीत सलग आठ वेळा स्वच्छ व सुंदर शहर म्हणून राष्ट्रीय प्रथम क्रमांकाचे लौकिक प्राप्त इंदौर आयआयटी कॅम्पस मध्ये दिमाखदार व भव्य सोहळ्यात तिला तिच्या संशोधन कार्याची (Memristor based digital logic circuit design) दखल घेऊन मास्टर ऑफ सायन्स (M.S. by research)ही उच्च पदवी संस्थांचे डायरेक्टर प्रोफेसर डॉ सुहास जोशी यांच्या हस्ते कौतुकाने बहाल करण्यात आली. कोकणातील डोंगराळ व मागास भागात असलेल्या छोट्याशा मराठी शाळेतील या श्रुतीची दैदिप्यमान कामगिरी सर्वच विद्यार्थ्यांना व पालकांना प्रेरणादायी आहे . मराठी शाळांना व ग्रामीण भागाची अवहेलना करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना याच्यातून बोध मिळेल. श्रुतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

श्रुती घोडके












