वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी–नावळे–सांगुळवाडी–सडुरे–शिराळे या प्रमुख मार्गाच्या दुतर्फा वाढलेल्या झाडांच्या फांद्या तातडीने छाटण्यात याव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डी. के. सुतार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, या मार्गावरील झाडांच्या फांद्या आणि झुडपे मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे एस.टी. बससह अन्य वाहनचालकांना वाहतूक करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. पावसाळ्यात झाडांच्या फांद्या रस्त्यावर झुकत असल्याने समोरून येणारी वाहने वेळेत दिसत नसल्याने गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याच प्रमाणे काही वर्षांपूर्वी मुख्यमंत्री सडक योजनेतून झालेल्या रस्त्याची दुरावस्था झाली असून वाहन चालवणे मुश्कील झाले आहे या रस्त्याची ताबडतोब डाकडीची करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
या मार्गावर दररोज शालेय विद्यार्थी, नागरिक आणि प्रवासी मोठ्या संख्येने प्रवास करीत असल्याने सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित विभागाने तातडीने झाडांच्या फांद्यांची छाटणी करून वाहतूक सुरक्षित व सुरळीत करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.












