भिरवंडे येथील आरोग्‍य शिबिरात १११ नागरीकांचा सहभाग

ग्रामपंचायत,आरोग्‍य उपकेंद्र, कोकण कला शिक्षण संस्‍थेचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत भिरवंडे आरोग्‍य उपकेंद्र भिरवंडे आणि कोकण कला व शिक्षण संस्‍था भिरवंडे यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने मोफत आरोग्‍य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. केंद्रशाळा भिरवंडे नं. १ येथे झालेल्‍या शिबिरात १११ नागरीकांनी सहभाग घेतला. शिबिरात मोतीबिंदू संशयीत २६, रक्‍ततपासणी ६०, इसीजी ६३, तर ५९ रुग्णांचे चेस्‍ट एक्‍सरे घेण्यात आले. रुग्‍णांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.

१५वा वित्त आयोग अंतर्गत आयोजित शिबिराचे उद्घाटन कनेडी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुमंत दळवी यांच्‍याहस्‍ते करण्यात आले. डॉ.चंद्रकात पुरळकर, डॉ.संकेत पोकळे, डॉ. योगिता राणे, नेत्र चिकित्‍सा तज्ञ मारुती सावंत, प्रशासक नितिन सावंत, ग्रा.प.सदस्‍या अंकिता सावंत, शाळा व्‍यवस्‍थापन समिती अध्यक्ष सतिश सावंत, भिरवंडे नं.१ चे मुख्याध्यापक जगन्‍नाथ घाडीगांवकर, ज्‍येष्ठ नागरीक चंद्रकांत सावंत, सदानंद सावंत, संस्‍कृती देशमुख, शिला कांबळे, अक्षता सावंत, संभाजी नांदगावकर, कोकण कला व शिक्षण संस्‍थेचे चेतन धर्णे, अमोल गुराम, पोलिस पाटील, बाळकृष्ण सावंत, तुषार राणे, अंगुली कांबळे आदी उपस्‍थित होते.

शिबिरात नेत्र, रक्‍त, इसिजी तपासणी, चेस्‍ट एक्‍सरे, स्‍त्रीरोग तपासणी, जनरल आरोग्‍य तपासणी करण्यात आली. काही नागरिकांचे आयुष्यमान कार्ड काढण्यात आले. तसेच मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. गुरुपौर्णिमेच्‍या निमित्ताने मुख्याध्यापक सुमंत दळवी यांचा सन्‍मान करण्यात आला.
आहार विषयक मार्गदर्शन करताना डॉ.चंद्रकांत पुरळकर यांनी निसर्गाने दिलेल्‍या शरिराची आपण योग्‍य ती काळजी घेतली पाहीजे. आपण सोन्‍याच्‍या दागिण्यांची जपनुक करतो. त्‍याचबरोबर सोन्‍यासारखे शरिराला ही जपले पाहिजे. यासाठी आहार, व्‍यायाम व विश्रांती ही त्रिसुत्री पाळणे आवश्यक आहे. सुखसुविधांचा लाभ घेण्यासाठी चांगले आरोग्‍य असणे आवश्यक आहे. निरोगी असणे हेच खरे सुख आहे. महिलांकडून आरोग्‍याकडे नकळतपणे दुर्लक्ष होत असतो मात्र तसे न करता आपली कामे आटोपताना आरोग्‍याचीही काळजी घ्यायला हवी असे सांगितले. सुत्रसंचालन समिर शिर्के तर आभार चेतन धर्णे यांनी मानले.

error: Content is protected !!