वैभववाडी (प्रतिनिधी) : गुरुपौर्णिमा म्हणजे धार्मिक विधी, पूजा-अर्चा आणि महाप्रसाद असे पारंपरिक स्वरूप सर्वत्र पाहायला मिळते. मात्र मांगवली येथील श्री स्वामी समर्थ मठात यंदा गुरुपौर्णिमा समाजोपयोगी उपक्रमांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली.धार्मिक कार्यक्रमासोबतच शेतकरी व ग्रामस्थांसाठी विविध शासकीय योजना, पिक विमा, डिजिटल सुरक्षितता आणि बँकिंग योजनांबाबत जनजागृती करण्यात आल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अमोल श्रीधर राणे व योगिता अमोल राणे यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमात प्रथम श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन करून आरती करण्यात आली. त्यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. याचवेळी शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देऊन उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
कृषी विभागाचे एम. के. शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कृषी योजनांची सविस्तर माहिती दिली. सामाजिक वनीकरण विभागाच्या अनिता वाघमोडे यांनी सामाजिक वनीकरणाच्या योजनांची माहिती देत पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. इफको टोकिओ जनरल इन्शुरन्स कंपनीचे संदीप घुगरे यांनी पिक विमा योजनेविषयी मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. बँक ऑफ इंडियाचे महेश रावराणे यांनी डिजिटल फसवणुकीपासून बचाव, अटल पेन्शन योजना, विविध विमा योजना तसेच बँकिंग सुविधांबाबत सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमास आत्मा समिती वैभववाडीचे अध्यक्ष मंगेश कदम, शेतीनिष्ठ पुरस्कारप्राप्त शेतकरी महेश संसारे, सखाराम राणे, वनरक्षक अंकित काशीद, विशाल राणे, स्नेहल राणे, सचिन आयरे, मंगेश कोलते यांच्यासह ग्रामस्थ, महिला-पुरुष आणि स्वामीभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल अमोल श्रीधर राणे यांचे उपस्थितांनी अभिनंदन केले. तसेच कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य करणारे सखाराम उर्फ बाबू अण्णा यांचे आभार मानण्यात आले.
शेतीनिष्ठ पुरस्कारप्राप्त शेतकरी महेश संसारे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमामुळे गुरुपौर्णिमा हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजप्रबोधनाचे प्रभावी व्यासपीठ ठरला. श्रद्धा, सेवा आणि जनजागृती यांचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.












