कोमसाप मालवणचा नमन नटवरा कार्यक्रम संपन्न

आचरा (प्रतिनिधी) : कोकण मराठी साहित्य परिषद मालवणच्या कलाकारांनी सादर केलेला “नमन नटवरा” हा कार्यक्रम नुकताच मातोश्री मंगल कार्यालय आचरे येथील रंगमंचावर रुजारीओ पिंटो (जिल्हा समन्वयक कोमसाप), रामचंद्र आंगणे, (माजी उपशिक्षणाधिकारी सिंधुदुर्ग), दत्तात्रय मुळीक (माजी गटशिक्षणाधिकारी) पं. स. मालवण) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी सुरेश शामराव ठाकूर, अध्यक्ष कोमसाप, मालवण यांच्या अध्यक्षतेखाली प. पंडीत प्रसाद सावकार यांना कोमसाप मालवणच्या वतीने श्रद्धांजली देण्यात आली. त्यावेळी सुरेश ठाकूर म्हणाले की, प. पंडीत प्रसाद सावकार यांनी आपले संपूर्ण आयुष्य संगीत रंगभूमीला वाहिले, पंडितराज जगन्नाथ या नाटकातील “जय गंगे भागीरथी ” या गाण्याने तर लोकप्रियतेचा कळस गाठला. त्यांनी भूमिका केलेली संगीत संशय कल्लोळ, कट्यार काळजात घुसली, संगीत होनाजी बाळा, मंदारमाला आदी अनेक नाटकांनी मराठी मने त्यांच्या वयाच्या ९८ व्या वर्षापर्यंत रिझविली.

कोमसाप मालवणचा आजचा नमन नटवरा हा कार्यक्रम त्यांच्या पवित्र स्मृतीस अर्पण करून त्यांना भावांजली देत आहे. त्यानंतर जय जय गौरीशंकर मधील “सप्तसूर झंकारीत बोले” ही विद्याधर गोखले यांची नांदी गाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी कोमसाप मालवणच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम करणेत आले.
इतिहासाचा तास — विनोदी प्रहसन — कुमार कांबळे आणि सुनंदा कांबळे, नाट्यछटा–संवाद– प्राजक्ता खोत, कहाणी म्हणींची — सुसंवाद — चंद्रशेखर धानजी आणि उज्वला धानजी, मुलाखत — मोलकरणीचा यशस्वी प्रवास — मधुरा माणगावकर आणि रसिका तेंडोलकर, भिंगरो कोंबडो — मालवणी गीतावर डान्स–त्रिंबक आजगावकर, कथ्थक नृत्य–श्रावण गीतावर नृत्य– शरयू घाडी , बुवाबाजी एक फसवेगिरी — अंधश्रद्धा निर्मूलन प्रात्यक्षिके –विजय चौकेकर व त्यांचे सहकारी संजय परब, सायली परब, श्रुती गोगटे, मनाली फाटक आणि योगेश मुणगेकर, एकपात्री प्रयोग — मत्सगंधा नाटकातील देवव्रतची भूमिका–, मंदार सांबारी आणि दशावतार — पातळकेतूची भूमिका — विनोद कदम.. सदर कार्यक्रमाची निर्मिती सुरेंद्र सकपाळ नाट्य विभाग प्रमुख कोमसाप मालवण यांनी केली. त्यांना रमाकांत शेटये , महादेव बागडे यांचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमाला कोमसाप आणि कथामाला मालवणचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते..

error: Content is protected !!