खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद शालेय शिक्षण विभागाच्या वतीने छ.शिवाजी महाराज महाराजास्व समाधान शिबिर अभियाना अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना विविध जनजागृती करणे व विद्यार्थी कल्याण उपक्रमा बाबत विशेष मार्गदर्शन कार्यशाळा नुकतीच जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथे संपन्न झाली. या कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून यश कॉम्प्युटर अकॅडमीचे संचालक मंगेश गुरव, खारेपाटण पोलिस स्टेशन चे कॉन्स्टेबल महेश फाळके, सेवानिवृत्त शिक्षिका स्मिता कोरगावकर तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीच्या माजी अध्यक्षा प्राप्ती कट्टी विद्यमान अध्यक्ष मंगेश ब्रम्हदंडे, उपाध्यक्ष संध्या पोरे, शाळेच्या मुख्याध्यापिका आरती जोजन ग्रामस्थ कुणाल गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी “करिअर मार्गदर्शन व सायबर सुरक्षा ” या विषयावर मंगेश गुरव यांनी विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले. तर “विद्यार्थी सुरक्षा, वाहतूक नियम व महिला व बाल सुरक्षा” या विषयावर महेश फाळके यांनी मार्गदर्शन केले व “समुपदेशन, मानसिक आरोग्य ताण तणाव व्यवस्थापन व किशोरवयीन आरोग्य” या विषयावर स्मिता कोरगावर यांनी विद्यार्थ्यांना परिपूर्ण असे मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला उपस्थित सर्व मार्गदर्शक मान्यवरांचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तर या कार्यशाळेचे उद्घघाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेश ब्रम्हदंडे यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. संपूर्ण कार्यशाळेत शाळेच्या एकूण १०६ विद्यार्थांनी सहभाग घेतला. तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शाळेच्या मुख्याध्यापिका आरती जोजन यांनी केले.














