ॲड. प्राजक्ता म.शिंदे-सावंत यांचा यशस्वी युक्तिवाद
मालवण (प्रतिनिधी) : पो.स्टे.गु.र.नं.११६/२०२६ चे कामी कुमार नारायण राठोड, राहा-मखनापूर, ता-उत्तर विजापूर, जिल्हा-विजापूर, राज्य- कर्नाटक यांचेवर भारतीय न्याय संहिता कलम ६४(१), ६४(२)(i), ६४(२)(m) सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४, ६, ८, १०, १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. आरोपी तर्फे दिलेल्या जामीन अर्जावर सुनावणी झाली व आरोपी यास रु.५०,०००/- च्या सशर्थ जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिनांक २९/०७/२०२६ रोजी विशेष सत्र न्यायाधीश ओरोस यांनी दिले. आरोपीच्यावतीने ॲड.प्राजक्ता म.शिंदे-सावंत यांनी काम पाहिले.
याबाबतची थोडक्यात हकीकत अशी की, अल्पवयीन पिडीत फिर्यादी हिने माहे डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ०२.०० वा. चे मानाने ती राहत असलेल्या ओरोस येथील घरी कोणी नसताना कुमार नारायण राठोड, वय २३ वर्षे मूळ रा. मखनापूर, ता. उत्तर विजापूर जि. विजापूर, राज्य- कर्नाटक याने तिच्याशी जबरदस्तीने शरिरीक संबंध केले असून त्यातच ती गर्भवती राहिली होती. परंतु घडलेल्या प्रकाराबाबत तिने घरी कोणास सांगितले तर घरात वाद होतील म्हणून घाबरून कोणाला काही सांगितले नाही. तसेच सुरवातीला सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे येथील पोलीसांना रोहित सखाराम राठोड याने व त्यानंतर निखिल (नाव व पत्ता माहित नाही) याने तिच्याशी जबरदस्ती शारिरीक संबंध केले होते असे खोटे सांगितले असलेबाबत हकीगत केली आहे. त्यानुसार तिचा सविस्तर पुरवणी जबाब नोंदविण्यात आला. पिडीत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
गुन्ह्यातील संशयित आरोपी यास दिनांक ०९/०७/२०२६ रोजी अटक करण्यात आली व दिनांक १०/०७/२०२६ रोजी न्यायालयीन कोठडीत घेण्यात आले. तद्नंतर संशयित आरोपी यांचेकडून जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. सदर जामीन अर्जावर झालेल्या सुनावणी अंती मे. विशेष सत्र न्यायाधीश ओरोस यांनी दिनांक २९/०७/२०२६ रोजी संशयित आरोपी कुमार राठोड यांची रु.५०,०००/- च्या सशर्त जामीनावर मुक्तता केली. संशयित आरोपीच्या वतीने ॲड. प्राजक्ता शिंदे- सावंत यांनी यशस्वी युक्तिवाद केला.












