बांदा पोलीस ठाण्यात शांतता समिती व महिला दक्षता समितीची बैठक

बांदा (प्रतिनिधी) : बांदा पोलीस ठाण्यात आज शांतता समिती व महिला दक्षता समितीची संयुक्त बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साटम आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे उपस्थित होते. त्यांनी कायदा व सुव्यवस्था, महिला सुरक्षा आणि नागरिकांच्या सहकार्याबाबत तसेच शहरातील पार्किंग, वाहतूक नियोजन याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

बैठकीत शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. रात्रीच्या वेळी शहरात नियमित पोलीस गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली. शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने कार्यान्वित करण्याची आवश्यकता उपस्थित करण्यात आली. तसेच अंमली पदार्थांच्या (ड्रग्ज) वाढत्या वापरावर प्रभावी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. उड्डाणंपूलाखाली अनधिकृत पार्किंग करण्यात येत असल्याने वाहतुकीची कोंडी होते. यासाठी याठिकाणी वाहतूक पोलिसाची नेमणूक करण्याची मागणी करण्यात आली.

याशिवाय शहरातील परप्रांतीय कामगार व भाडेकरू यांची पोलीस ठाण्यात अनिवार्य नोंद करण्याबाबत सूचना करण्यात आली. अलीकडेच शहरात अल्पवयीन युवतीवरील अत्याचाराच्या घटनेतील आरोपी हा परप्रांतीय असल्याच्या पार्श्वभूमीवर या विषयावर विशेष चर्चा झाली. शहरात परप्रांतीय कामगारांची संख्या वाढल्याने त्यांच्या मुकादमांची बैठक घेऊन या कामगारांची नोंद पोलीस ठाण्यात करण्याची मागणी करण्यात आली.

आठवडा बाजार परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एकदिशा वाहतूक व्यवस्था (वन-वे) लागू करण्याची मागणीही बैठकीत करण्यात आली. उपस्थित अधिकाऱ्यांनी सर्व सूचना व मागण्या नोंदवून त्यावर आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन साटम यांनी दिले. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अन्वर खान, भाजप महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अर्चना पांगम, ऍड नीता राणे, इन्सुली पोलीस पाटील जागृती गावडे, माजी उपसरपंच आबा धारगळकर, बाळु सावंत, मधुकर देसाई, ग्रामपंचायत सदस्य रुपाली शिरसाट, रेश्मा सावंत, दर्शना केसरकर, बंडया खान, पत्रकार मंगल कामत, नीलेश मोरजकर, प्रवीण परब आदी उपस्थित होते

error: Content is protected !!