हवालदार देवानंद मिठबावकर यांनी तीन दिवसांत दोषारोपपत्र केले दाखल, गुन्हा सिद्ध
कणकवली (प्रतिनिधी) : गोव्याहून मुंबईच्या दिशेने विरुद्ध दिशेच्या लेनने मद्यप्राशन करून भरधाव वेगाने कंटेनर घेऊन जात असल्याप्रकरणी अजयकुमार शिवबहादुर यादव (३२, रा. उत्तर प्रदेश) याचा दोषारोप सिद्ध होऊन त्याला १६ हजार २०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार हवालदार देवानंद मिठबावकर यांनी कणकवली न्यायालयात गुन्हा दाखल झाल्यापासून तीन दिवसांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलेहोते. राष्ट्रीय महामार्ग सुरक्षा वाहतूक पोलीस दलाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश गवस यांनी सहकारी पोलिसांसह ओसरगाव टोलनाक्यापासून सदर चालक कंटेनर विरुद्ध दिशेने कंटेनर चालवताना त्याचा पाठलाग करून वागदे येथे पकडले होते. नंतर कणकवली पोलिसांच्या ताब्यात दिले होते. या बाबत शुक्रवार २५ जुलै रोजी कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चालक अजयकुमार यादव याला सोमवारी कणकवली न्यायालयात हजर केले असता १६ हजार २०० रूपयांचा दंड ठोठावण्यात आला.
अजयकुमार हा कंटेनर (एमएच१२ व्हीटी ७४९८) घेऊन गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. मात्र तो मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या विरुद्ध लेनवरून कंटेनर चालवत असल्याबाबत जागरूक नागरिकांनी महामार्ग पोलीस केंद्र कसाल कणकवली यांना कळविले होते. त्यानुसार महामार्ग पोलिसांनी त्याला वागदे गावठणवाडी येथे अडवून पकडण्यात आले होते. त्याच्यावर मद्यपान करून व धोकादायक पद्धतीने वाहन चालविल्याबाबत कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.












