बेकरी कामगाराने चोरली दुचाकी ; एलसीबी ने आवळली गचांडी

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातून चोरीस गेलेल्या दुचाकीचोरटयाचा छडा सिंधुदुर्ग एलसीबी ने लावला असून चोराला गजाआडसुद्धा केले आहे. सुशांत सिद्धार्थ यादव ( वय 19, मूळ रा.श्रावण बौद्धवाडी, ता. मालवण सध्या रा.तळेरे ) यानेच ही चोरी केल्याचे पोलीस तपासात उघड झाल्यानंतर एसपी डॉ दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, एलसीबी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी चे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू जामसंडेकर यांच्या नेतृत्वाखाली हवालदार ज्ञानेश्वर तवटे, हवालदार किरण देसाई हवालदार आशिष गंगावणे यांच्या पथकाने ही कारवाई गुरुवार 30 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता तळेरे येथे केली. 28 फेब्रुवारी रोजी रात्री सुनील कोरगावकर यांनी आपल्या मालकीची सुझुकी ऍक्सेस ही दुचाकी कणकवली शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया समोर उभी केली होती. या दुचाकीची चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुनील कोरगावकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.या दुचाकी चोरट्याचा समांतर तपास एलसीबी सिंधुदुर्ग चे पथक करत होते. तांत्रिक कौशल्य आणि मानवी कौशल्याच्या आधारे सदर दुचाकी तळेरे येथील एकाने चोरल्याचे एलसीबी ला समजले होते. त्यानुसार गुरुवार 30 एप्रिल रोजी एलसीबीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू जामसंडेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तळेरे येथे शोध घेतला असता सदर दुचाकी तळेरे येथील बेकरी च्या भट्टीमध्ये काम करत असलेल्या सुशांत सिद्धार्थ यादव याने चोरल्याचे समजले. त्यानुसार सुशांत याला तळेरे येथील बेकरीतून 30 एप्रिल रोजी एलसीबी च्या पथकाने ताब्यात घेऊन कणकवली पोलिसांच्या हवाली केले. आरोपी सुशांत यादव हा अट्टल दुचाकीचोर असून यापूर्वीही त्याच्यावर दोनवेळा दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!