कणकवली (प्रतिनिधी) : तरंदळे येथील श्री टेवणादेवी मंदिराचा २४ वा दिन मोहळा बुधवार, दि. ६ मे २०२६ रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या उत्साहात साजरा होणार आहे. या निमित्ताने गावात भक्तिमय वातावरण निर्माण होऊन भाविकांसाठी कार्यक्रमांची समृद्ध मेजवानी असणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता मंदिरातील सर्व देवतांच्या अभिषेकाने होईल. सकाळी ११ वाजता श्री सत्यनारायण महापूजा पार पडणार असून, दुपारी १ वाजता आरतीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
संध्याकाळी ४ वाजता स्थानिक भजनांनी भक्तिरसाची सुरुवात होईल, तर सायंकाळी ७ वाजता देवगड येथील कलाकारांकडून आकर्षक समई नृत्य सादर केले जाईल. रात्री ९ वाजता गावातील जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात येणार असून, त्यांच्या योगदानाचा गौरव केला जाणार आहे.
रात्री १० वाजता तेंडोलकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ, झाराप यांच्याकडून “हर हर तुंगारेश्वर” हे वसई येथील तुंगारेश्वर तीर्थक्षेत्रावर आधारित नाट्यप्रयोग सादर होणार आहे, ज्याची रसिकांना विशेष उत्सुकता आहे.
या सोहळ्यासाठी श्री देवणादेवी मंदिर देवस्थान समिती, तरंदळे यांनी सर्व भाविकांना उपस्थित राहण्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले आहे.












