साकेडी रेल्वे फाटकानजीकच्या अंडरपाससाठी 30 एप्रिल रोजी मेगा ब्लॉक

खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश

गेल्या अनेक वर्षांच्या मागणीला अखेर मूर्त स्वरूप येणार

उपसरपंच प्रज्वल वर्दम यांची माहिती

कणकवली (प्रतिनिधी) : कोकण रेल्वे मार्गावरील साकेडी येथे अंडरपासचे काम पूर्णत्वास नेले जाणार आहे. त्यासाठी गुरूवार (ता.३०) रात्री ११ ते शुक्रवार (ता.१) पहाटे ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे दादर-तिरूनवेली आणि तिरूअनंतपुरम ते लोकमान्य टिळक टर्मिनस या दोन गाड्या विलंबाने धावणार आहेत. मेगा ब्लॉक काही प्रमाणात कमी जास्त होण्याची देखील शक्यता असल्याची माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे. दरम्यान खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांचा पाठींबा आणि सततच्या प्रयत्नांमुळे साकेडीवासीयांची मागील 28 वर्षांची साकेडी फाटक अंडरपासची मागणी अखेर पूर्णत्वास जात असल्याचे साकेडी उपसरपंच प्रज्वल वर्दम यांनी सांगितले. कोकण रेल्वे मार्गावरील साकेडी येथे रेल्वे फाटक आहे. रेल्वे मार्गावर दर अर्ध्यातासाने गाड्या धावत असल्याने हे फाटक वारंवार बंद होते. यात साकेडी-करूळ, व पर्यायाने करंजेसह आसपासच्या भागांमध्ये जाणाऱ्या या मार्गावरील प्रवाशांचा खोळंबा होत होता.

यावर पर्याय म्हणून साकेडी रेल्वे फटकापासून काही अंतरावर अंडरपास बांधला जात आहे. या अंडरपाससाठी 9 सिमेंटचे बॉक्स तयार करण्यात आले आहेत. तसेच हे अंडरपास साठीचे काँक्रीटचे बॉक्स उचलण्यासाठी ज्या पद्धतीने महामार्गाचे गर्डर उचलण्यासाठी क्रेन आणली होती त्याच ताकदीची क्रेन देखील साकेडी रेल्वे फाटक या ठिकाणी दाखल झाली आहे. गुरूवारी (ता.३०) रात्री ११ वाजता मडगाव ते नागपूर ही एक्सप्रेस रवाना झाल्यानंतर साकेडी येथील अंडरपासच्या ठिकाणचे रेल्वे रूळ कट करून त्या ठिकाणी हे अंडर पासचे बॉक्स बसवले जाणार आहेत. भविष्यात होणाऱ्या कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचा प्रस्ताव डोळ्यासमोर ठेवून दुपदरीकरणाच्या दृष्टीनेच हा अंडरपास बनवला जात आहे. त्यांनतर येथील रेल्वे मार्ग खोदून तेथे सिमेंटचे अंडरपासचे बॉक्स बसविले जाणार आहेत. त्यानंतर पुन्हा रेल्वे रूळ जोडून कोकण रेल्वेचा मार्ग खुला केला जाणार आहे. याकरिता कोकण रेल्वेच्या बेलापूर या मुख्य कार्यालयापर्यंत परवानगी चे पत्रव्यवहार व त्या अनुषंगाने कार्यवाही युद्ध पातळीवर सुरू आहे. या सर्व कामासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने पाच तासांचा मेगाब्लॉक मंजूर केला आहे. १ मे रोजी पहाटे चार वाजता हे काम पूर्ण होऊन रेल्वे मार्ग पुन्हा सुरू होईल अशी अपेक्षा कोकण रेल्वेला आहे. कोकण रेल्वे मार्गावरील या मेगाब्लॉकमुळे दादर ते तिरूनवेली ही एक्सप्रेस नांदगाव स्थानकात थांबवून ठेवली जाणार आहे. तर तिरूअनंतपुरम ते लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी मडगाव स्थानकात थांबवली जाणार आहे. गेल्या अनेक वर्षांच्या या मागणीला मूर्त स्वरूप येणार असून तासंतास या रेल्वे फटकामध्ये थांबण्याचा मनस्ताप देखील यामुळे आता वाचणार आहे.

error: Content is protected !!