कणकवली (प्रतिनिधी) : रेल्वे मधील रोख रक्कम चोरीच्या गुन्ह्यात अवघ्या तीन दिवसांत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करून चोरीच्या गुन्ह्यात आरोपीला शिक्षा झाल्याबद्दल गुन्ह्याचे तपासी अंमलदार हवालदार चंद्रकांत झोरे यांचा कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर उपस्थित होते. ठाणेतून कणकवली पर्यंत कोकण रेल्वेच्या प्रवासात एका प्रवाशाचे पैशाचे पाकीट चोरण्यात आले. नांदगाव रेल्वे स्टेशन लगत चोरीची घटना उघडकीस आली. त्या संशयिताला कणकवली रेल्वे स्थानकावर ताब्यात घेत रेल्वे पोलिस बलाच्या कर्मचाऱ्यांनी कणकवली पोलिसांच्या ताब्यात दिले होते. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कासार्डे पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस हवालदार चंद्रकांत झोरे यांनी केला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या तीन दिवसांत आरोपीविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात आरोपीचा गुन्हा शाबीत होऊन आरोपीला दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. याबद्दल कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते हवालदार झोरे यांचा सत्कार करण्यात आला.
हवालदार चंद्रकांत झोरे यांचा पोलीस महानिरीक्षकांच्या हस्ते सत्कार












