फोंडाघाट महाविद्यालयात YCMOU चे बी.बी.ए. व बी.ए. अभ्यासक्रम सुरू

ग्रामीण विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण उच्चशिक्षणाची संधी

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाटला शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक (YCMOU) यांच्याकडून लर्निंग सपोर्ट सेंटर (LSC) म्हणून अधिकृत मान्यता प्राप्त झाली आहे. या मान्यतेमुळे आता बी.बी.ए. (BBA) आणि बी.ए. (BA) हे पदवी अभ्यासक्रम फोंडाघाटमध्येच शिकणे शक्य झाले आहे. ही शैक्षणिक क्रांती घडवून आणण्यासाठी फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश सावंत, सेक्रेटरी चंद्रशेखर लिंग्रस, खजिनदार विठोबा तायशेटे, सर्व संचालक मंडळ आणि महाविद्यालय विकास समितीचे सदस्य यांनी सातत्याने दिलेले मार्गदर्शन आणि पाठबळ मोलाचे ठरले आहे, असे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांनी नमूद केले.

आजच्या जागतिक स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना केवळ पदवी पुरेशी राहत नाही, तर व्यवस्थापन कौशल्य, संप्रेषण क्षमता, आणि समाजाचे सखोल आकलन आवश्यक आहे. यासाठीच बी.बी.ए. आणि बी.ए. हे अभ्यासक्रम अत्यंत उपयुक्त ठरतात. बी.बी.ए. (Bachelor of Business Administration) हा अभ्यासक्रम व्यवस्थापन, मार्केटिंग, फायनान्स, उद्योजकता यासारख्या क्षेत्रांमध्ये करिअर घडवण्यास मदत करतो. तर, बी.ए. (Bachelor of Arts) मधून भाषा, समाजशास्त्र, इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र यासारख्या शाखांमध्ये सखोल ज्ञान मिळते.विशेष म्हणजे हे अभ्यासक्रम YCMOU अंतर्गत असल्याने विद्यार्थ्यांना नोकरी करतानाही शिक्षण घेता येते. यामुळे घरचा आर्थिक भार न वाढवता उच्चशिक्षण घेण्याची सुवर्णसंधी निर्माण करून दिली आहे.फोंडाघाट महाविद्यालयात बी.बी.ए. साठी 60 आणि बी.ए. साठी 120 जागांवर प्रवेश देण्यात येणार आहेत. यासाठी बारावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी पात्र आहेत. आतापर्यंत उच्च शिक्षणापासून वंचित राहिलेल्या गृहिणी, विविध व्यावसायिक व युवक युवती यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक (YCMOU) यांच्या अधिकृत मान्यता प्राप्त बी.बी.ए. (BBA) आणि बी.ए. (BA) हे पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात.

या अभ्यासक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक अभ्यासक्रम, आणि उज्वल करिअरसाठी आवश्यक ती सर्व कौशल्ये मिळणार आहेत. त्यामुळे भविष्यात शासकीय, खासगी तसेच उद्योजक क्षेत्रात रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होतील.विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी बी.बी.ए. अभ्यासक्रमासाठी: डॉ. बाजीराव डाफळे 7972859693, बी.ए. अभ्यासक्रमासाठी: प्रा. जगदीश राणे 9421267524, सर्वसामान्य मार्गदर्शनासाठी: डॉ. बालाजी सुरवसे 9421237365 यांच्याशी संपर्क साधावा.या अभ्यासक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शहरांकडे जाण्याचे प्रमाण कमी होणार आहे. शिक्षण, रोजगार आणि कौशल्यविकासाचा संगम म्हणजेच हे लर्निंग सेंटर विद्यार्थ्यांना स्वप्नपूर्तीसाठी हक्काचे व्यासपीठ ठरणार आहे. प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून जागा मर्यादित आहेत. त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी त्वरित संपर्क साधून प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांनी केले आहे.

error: Content is protected !!