“क्रांतिकारकांचा त्याग हा भारतीय स्वातंत्र्याचा पाया” – इतिहास विभागात क्रांतीदिनानिमित्त सेमिनार स्पर्धा उत्साहात!

फोंडाघाट (प्रतिनिधी) : कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटच्या इतिहास विभागाच्या वतीने क्रांतीदिन मोठ्या उत्साहात व राष्ट्रभावनेने साजरा करण्यात आला. “भारतीय स्वतंत्र लढ्यातील क्रांतिकारकांचे योगदान” या विषयावर सेमिनार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पुरंधर नारे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले, “क्रांतिकारकांच्या बलिदानातूनच स्वातंत्र्याचे अमृत साकारले गेले. त्यांच्या संघर्षमय जीवनकथांनी भारताच्या इतिहासात स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित ठेवली. तरुणाईने त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी कार्य केले पाहिजे.”

या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक, क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे, क्रांतिकारक तंट्या भिल्ल, क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, क्रांतीवीर बिरसा मुंडा, नेताजी सुभाषचंद्र बोस, शहीद भगतसिंग, शहीद सुखदेव, शहीद राजगुरू, राष्ट्रपिता महात्मा गांधी, आणि क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांच्या अद्वितीय कार्यावर सखोल प्रकाश टाकला.

विद्यार्थ्यांनी त्यांच्या क्रांतिकारी चळवळीतील योगदानाचे ऐतिहासिक संदर्भ, त्यावेळचे राजकीय-सामाजिक वातावरण, आणि आजच्या काळातील त्यांची विचारसरणीची उपयुक्तता यावर प्रभावी विवेचन केले. काही विद्यार्थ्यांनी क्रांतिकारकांच्या पत्रांचा आणि भाषणांचा संदर्भ देत श्रोत्यांच्या भावना भारावून टाकल्या.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. संतोष रायबोले यांनी ९ ऑगस्ट क्रांतिदिनाच्या पार्श्वभूमीवर भारत छोडो आंदोलन या ऐतिहासिक घटनेचे सविस्तर वर्णन केले. त्यांनी सांगितले, “ही केवळ इंग्रजांविरोधातील राजकीय घोषणा नव्हती, तर ती भारतीय जनतेच्या एकतेचा सर्वोच्च शिखरबिंदू होता. गांधीजींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देश उठून उभा राहिला आणि स्वातंत्र्याच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकले.”

डॉ. बालाजी सुरवसे यांनी आपल्या भाषणात क्रांतिकारकांचे बलिदान आणि त्यांच्या स्वप्नातील भारताचे चित्र रंगवले. त्यांनी म्हटले, “भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांसारख्या वीरांनी हसत-हसत फाशी स्वीकारली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूँगा’ ही घोषणा देत असंख्य तरुणांना लढ्यास प्रवृत्त केले. आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक, तंट्या भिल्ल, लहुजी साळवे यांनी जनतेत बंडाची ठिणगी चेतवली. या सर्वांचा त्याग म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याचा पाया आहे.”

स्पर्धेत प्रथम क्रमांक साक्षी संतोष परब, द्वितीय क्रमांक कस्तुरी तिरोडकर, तर तृतीय क्रमांक देवराज तुकाराम जोईल यांनी मिळवला. परीक्षक म्हणून डॉ. बालाजी सुरवसे आणि प्रा. विनोदसिंह पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वकौशल्याचे आणि विषयज्ञानाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांनी विषयाची मांडणी केवळ पाठांतरावर आधारित नसून अभ्यासपूर्ण व संशोधनाधिष्ठित केली आहे, हे विशेष उल्लेखनीय आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख डॉ. राज ताडेराव यांनी करताना क्रांतीदिनाचा ऐतिहासिक प्रवास, त्यामागील राजकीय घडामोडी आणि क्रांतिकारकांचा सहभाग यावर मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन कोमल जोईल यांनी उत्साहपूर्ण शब्दांत पार पाडले. या कार्यक्रमासाठी उपस्थित प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष उर्जा मिळाली. फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी व संचालक यांनी शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!