रामकृष्ण हरीच्या जयघोषात वझरेहून वारकऱ्यांचे पंढरपूरकडे प्रस्थान

भाजप युवा नेते विशाल परब व सौ. वेदिका परब यांची उपस्थिती

बांदा (प्रतिनिधी) : “राम कृष्ण हरी… विठ्ठल विठ्ठल…” या अखंड नामघोषात भक्तिमय वातावरणात दोडामार्ग तालुक्यातील वझरे येथून पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडी प्रस्थान सोहळ्याला उत्साहात प्रारंभ झाला. या प्रसंगी भाजप युवा नेते विशाल परब व सौ. वेदिका परब यांनी उपस्थित राहून वारकऱ्यांचे दर्शन घेत त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना विशाल परब म्हणाले, “वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या संत परंपरेचा आणि सामाजिक ऐक्याचा अमूल्य वारसा आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव यांसारख्या संतांनी दिलेला समता, सेवा, भक्ती आणि मानवतेचा संदेश आजही समाजाला दिशा देणारा आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन ही संत परंपरा जपली पाहिजे आणि दोडामार्गचा सांस्कृतिक व आध्यात्मिक वारसा अधिक उज्ज्वल केला पाहिजे.”

वारकरी संप्रदाय हा केवळ धार्मिक प्रवास नसून श्रद्धा, शिस्त, सेवा, समता आणि बंधुभाव यांचे जिवंत प्रतीक मानला जातो. दरवर्षी लाखो वारकरी टाळ-मृदंगाच्या गजरात, मुखी हरिनाम आणि हृदयात विठ्ठलभक्ती घेऊन पायी पंढरपूरची वारी करतात. समाजात प्रेम, सद्भावना आणि एकात्मतेचा संदेश देणारी ही परंपरा अनेक शतकांपासून अखंडपणे सुरू आहे.

“राम कृष्ण हरी”च्या जयघोषात आणि विठ्ठल नामाच्या अखंड गजरात वारकऱ्यांनी पंढरपूरच्या दिशेने भक्तिभावाने प्रस्थान केले. यावेळी ग्रामस्थ, भाविक आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.

error: Content is protected !!