बेकायदेशीर गुरे वाहतूक; टेम्पो चालकासह दोघांवर गुन्हा

वैभववाडी (प्रतिनिधी) : खारेपाटण येथून संकेश्वर (बेळगाव) येथे बेकायदेशीररीत्या गुरांची वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकासह अन्य एका व्यक्तीविरुद्ध वैभववाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विवेक शामराव कांबळे (रा. निपाणी) व रुपेश लहू जाधव (रा. कोदवली, ता. राजापूर) अशी संशयितांची नावे आहेत. ही कारवाई शुक्रवारी सकाळी सुमारे ६ वाजता भुईबावडा-हेत फाटा येथे करण्यात आली.

पोलीस कर्मचारी संदीप कांबळे, रणजित सावंत, हरीश जायभाय व श्रीकांत कराळे हे भुईबावडा परिसरात गस्त घालत असताना खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील हेत फाटा येथे वाहनांची तपासणी करीत होते. त्यावेळी खारेपाटणहून गगनबावड्याकडे जाणारा टेम्पो संशय आल्याने थांबवून त्याची तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान टेम्पोच्या हौद्यात चार गायी व दोन पाडे अशी एकूण सहा गुरे अत्यंत दाटीवाटीने भरल्याचे आढळून आले. याबाबत चालक विवेक कांबळे व त्याच्यासोबत असलेल्या रुपेश जाधव यांच्याकडे चौकशी केली असता, ही गुरे खारेपाटण येथील इम्रान लतीफ खान यांच्याकडून घेऊन संकेश्वर (बेळगाव) येथे नेत असल्याची माहिती त्यांनी दिली.

पोलिसांनी टेम्पोसह गुरे ताब्यात घेऊन वैभववाडी पोलीस ठाण्यात आणली. जप्त करण्यात आलेली गुरे कुसूर येथील गोशाळेत ठेवण्यात आली असून, टेम्पो चालक विवेक कांबळे व रुपेश जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार गणेश भोवड करीत आहेत.

error: Content is protected !!