स्मार्ट व्हिलेज प्रकल्पामुळे होणार गावांचा सर्वांगीण विकास – सभापती सिद्धेश रावराणे

एआय व डिजिटल साधनांच्या मदतीने वैभववाडीतील गावे होणार अधिक स्मार्ट

स्मार्ट व्हिलेजसाठी वैभववाडी तालुक्यातील २१ गावांची निवड केल्याबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांचे मानले आभार

वैभववाडी पं.स. येथे स्मार्ट व्हिलेज प्रकल्पाची आढावा बैठक संपन्न

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील पहिल्या टप्प्यातील २१ गावांमध्ये स्मार्ट व्हिलेज प्रकल्प राबविण्यात येत असून या प्रकल्पामुळे गावांच्या विकासाला नवी झळाळी मिळणार आहे. संबंधित यंत्रणांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प यशस्वी करणे आवश्यक आहे. एकजुटीने, योग्य नियोजन व डिजिटल साधनांचा प्रभावी वापर करून तालुक्यातील ही २१ गावे अधिक स्मार्ट बनवूया, असे प्रतिपादन पंचायत समितीचे सभापती सिद्धेश रावराणे यांनी केले. स्मार्ट व्हिलेज इंटेलिजन्स प्रकल्पांतर्गत वैभववाडी तालुक्यातील २१ गावांचा समावेश केल्याबद्दल त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानले.
यानिमित्ताने वैभववाडी पंचायत समिती येथे स्मार्ट व्हिलेज प्रकल्पाची आढावा बैठक पार पडली. बैठकीस माजी सभापती जयेंद्र रावराणे, उपसभापती साची कोलते, जिल्हा परिषद सदस्या रिद्धी सुतार, पंचायत समिती सदस्य देवानंद पालांडे, मंगेश लोके, सुवर्णा संसारे, गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ, सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीमती माने, विस्तार अधिकारी प्रकाश आडुळकर, तसेच सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सिद्धेश रावराणे म्हणाले की, या प्रकल्पामध्ये शेती, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, वीज व ऊर्जा व्यवस्थापन या क्षेत्रांवर विशेष भर दिला जाणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि विविध डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामविकासाला गती दिली जाईल. ड्रोन व सेन्सर आधारित शेती, कमी खर्चात आधुनिक शेती पद्धती, स्मार्ट क्लासरूम, ई-लर्निंग सुविधा, कौशल्य विकास व करिअर मार्गदर्शन यांचाही या प्रकल्पात समावेश असेल. याशिवाय गावकऱ्यांना विविध डिजिटल सेवा व नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून प्रकल्प यशस्वी करण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. ग्रामस्थांनी या उपक्रमाचा पुरेपूर लाभ घेऊन आपले गाव स्वयंपूर्ण व आधुनिक बनविण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी जयेंद्र रावराणे, विशाल चौगुले, शासकीय तंत्रनिकेतन मालवणचे प्राचार्य डॉ. दिलीप घायतिडक तसेच मंगेश लोके यांनी मार्गदर्शन केले. बैठकीस तालुक्यातील २१ गावांचे सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!