कणकवली (प्रतिनिधी) : ब्राह्मणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळ अंतर्गत कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाट येथील कृषी पदवीच्या अंतिम वर्षातील कृषिदूत यांनी ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत जाणवली येथे बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक आयोजित केले होते. भारतीय शेती क्षेत्रामध्ये बीज प्रक्रियेला महत्त्व आहे. पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेमध्ये येणाऱ्या बुरशी जन्य रोग, रसशोषक किडी यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत असते. याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पेरणी पूर्व बीज प्रक्रिया करणे आवश्यक असते. यासाठी कृषीदूतांनी गावातील शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे महत्त्व पटवून दिले, तसेच बीज प्रकिया कशी करावी याचे मार्गदर्शन केले.
कृषीदूत ओम भांगरे, अथर्व भोवर, देवराज निंबाळकर, सिद्धेश पताडे, सार्थक डोणे, प्रथमेश परब, अभिनव पी. सी., अतुल शी. ए. यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले. शेतकऱ्यांनी या प्रात्यक्षिकाला सुंदर असा प्रतिसाद दिला. त्यांना प्राचार्य श्री. संते, अथर्व बागडे आणि प्राध्यापिका अस्मिता पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.












