युवा पिढीने कुटुंबियांप्रती जबाबदारी स्वीकारणे गरजेचे – संदिप परब

फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात संदिप परब यांचे प्रेरणादायी व्याख्यान

खारेपाटण (प्रतिनिधी) : आजच्या तरुण पिढीमध्ये सामाजिक भान जागृत करण्याच्या उद्देशाने जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते संदिप परब यांचे प्रेरणादायी व्याख्यान फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात संपन्न झाले.

या व्याख्यानात विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा संतुलित वापर, आई-वडिल व आजी-आजोबांबाबत आदराची भावना, तसेच दारू व मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी बोलताना श्री. परब यांनी “आधुनिकतेच्या झगमगाटात माणूसकी हरवू लागली आहे. यामुळे युवकांनी आत्मचिंतन करणे आणि आपल्या कुटुंबियांप्रती जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे.” असे प्रतिपादन केले.

जीवन आनंद संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहितीही यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली. व्यसनमुक्ती अभियान, वृद्धाश्रम भेटी तसेच युवकांसाठी प्रेरणादायी कार्यशाळा यासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचे कार्य संस्थेने हाती घेतले आहे.

कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंदर नारे, डॉ. सतीश कामत, प्रा. विनोदसिंह पाटील, डॉ. विद्या मोदी, प्रा. रूपाली पाटील, दीपक सावंत, दिलीप सावंत, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी या व्याख्यानातून मिळालेल्या विचारांना सकारात्मक प्रतिसाद दिला. आशिष कांबळी यांची प्रेझेंटेशन संयोजनात भूमिका राहिली.

error: Content is protected !!