कुडाळ (प्रतिनिधी) : सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पिंगुळी येथील तलाठी जितेंद्र काळू खेताडे (वय २८) याला सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) रंगेहाथ पकडले. कुडाळ-वेंगुर्ले रस्त्यावरील रेल्वे पुलाजवळ सायंकाळी सुमारे ४.३० वाजता ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे ३५ वर्षीय वकील असून, त्यांनी आपल्या अशिलाच्या सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी सुमारे दोन महिन्यांपूर्वी पिंगुळी तलाठी कार्यालयात अर्ज दाखल केला होता. या कामाचा पाठपुरावा करताना तलाठी खेताडे यांनी नोंद पूर्ण करून देण्यासाठी ५ हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदारांनी २३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर विभागाच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली. या पडताळणीत तलाठ्याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.
तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तलाठी कार्यालयात भेट होऊ न शकल्याने तक्रारदारांनी खेताडे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला. त्यानंतर खेताडे यांनी त्यांना कुडाळ-वेंगुर्ले रस्त्यावरील रेल्वे पुलाजवळ बोलावले. तेथे ५ हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना पथकाने त्यांना पकडले.या प्रकरणी खेताडे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ (सुधारित २०१८) मधील कलम ७ अन्वये कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
ठाणे परिक्षेत्राचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे आणि सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सिंधुदुर्ग विभागाच्या पोलीस उपअधीक्षक संगीता पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकात पोलीस निरीक्षक दीपक माळी, पोलीस हवालदार प्रीतम कदम, महेश जगताप, नागेश खोत, योगेश मुंढे, भूषण नाईक आणि स्वाती राऊळ यांचा समावेश होता.












