कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरासह आजूबाजूच्या गावांमध्ये आज परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. सोसाट्याचा वारा, विजांचा लखलखाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी बरसण्यास सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे परिसरात पावसाळी वातावरण निर्माण झाले.
गेल्या काही दिवसांपासून उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले होते. मात्र, आज परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला असून, नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून शुक्रवारी दुपारनंतर यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. तसेच जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली.
वारा आणि विजांच्या कडकडाटासह सुरू झालेल्या या पावसामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. विशेषतः विजांचा कडकडाट होत असताना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.












