वैभववाडी तालुका हा विकसित व समृद्ध तालुका म्हणून ओळख झाली पाहिजे – खासदार नारायण राणे

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका हा राज्यात विकसित व समृद्ध तालुका म्हणून ओळखला गेला पाहिजे यासाठी अधिकारी पदाधिकारी यांनी पारदर्शक व प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. शिस्त प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा, आपण ज्या संस्थेत काम करतो त्या संस्थेवर आपले प्रेम असले पाहिजे. प्रशासन उत्तम असेल तरच विकास होतो, असे मत खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केले. वैभववाडी पंचायत समितीच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा खासदार राणे यांच्या हस्ते पार पडला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खेबूडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, वैभववाडी नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे, कार्यकारी अभियंता श्री. सावंत आदी उपस्थित होते.

यावेळी खासदार नारायण राणे यांनी आपल्या भाषणात चौफेर फटकेबाजी करीत अधिकारी व पदाधिकाऱ्यांना कान पिचक्या दिल्या. आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले, नागरिक म्हणून आपली सुद्धा जबाबदारी आहे. आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी योग्य पद्धतीने काम करतात की नाही हे पाहणे आपले कर्तव्य आहे. प्रशासन उत्तम असेल तरच विकास होतो. पदाधिकाऱ्यांनी पद मिळाले म्हणून हुशारकी मारू नये, तर त्या पदाबरोबर तुमची नैतिक जबाबदारी आहे ती योग्य पद्धतीने पार पाडली पाहिजे. यासाठी प्रशासनाचा अभ्यास लोकप्रतिनिधींनी करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्हा हा निसर्ग संपन्न जिल्हा आहे मात्र आपण फक्त पारंपरिक पद्धतीने शेती करतो त्याचे मूल्यांकन किंवा मूल्यमापन आपण करत नाही. ज्या पद्धतीने पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी शेतीमध्ये करत असलेले नवनवीन प्रयोग व त्यासाठी घेत असलेली मेहनत याचा आपण आदर्श घेणे आवश्यक आहे. आपले उत्पन्न वाढवले पाहिजे. दरडोई उत्पन्न वाढविण्याचा निर्धार आपण केला आहे. त्यासाठी तुमची साथ हवी. मला काम नाही म्हणणारे अधिकारी आवडत नाहीत तर लोकहिताचे काम कायद्यात बसवून करणारे अधिकारी आपल्याला पाहिजे. कामे कोणीही करा पण ती वेळेत व दर्जेदार झाली पाहिजे. आज टक्केवारी ही तळागाळापर्यंत पोहोचले असून विकासाला लागलेली ही मोठी कीड आहे. काम दर्जेदार व्हायचे असेल टक्केवारीची कीड नष्ट केली पाहिजे. आपण लोकांची सेवा करण्यासाठी आलो आहोत याचे भान आपण ठेवले पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. पर्यटनातून जिल्ह्याच्या विकासाला मोठी संधी आहे. त्यामुळे पर्यटक हा आपली लक्ष्मी आहे असे समजून त्याची सेवा केली पाहिजे. पर्यटनातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास साध्य करता येईल. बाजारपेठेत काय मागणी आहे याचा विचार करून शेतकऱ्यांनी उत्पादन घेतले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा सर्वच बाबतीत एक नंबर असला पाहिजे असे त्यांनी सांगितले. तर पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, वैभववाडी आणि राणे कुटुंब यांचे अतूट नात आहे. २०१४ मध्ये या इमारतीचे भूमिपूजन पार पडले. त्यावेळी आमदार मीच होतो. इमारत पूर्ण होण्यास उशीर झाला ही गोष्ट खरी आहे. परंतु मी मागील आठ वर्ष विरोधी पक्षाचा आमदार होतो. त्यामुळे निधीसाठी भांडावं लागायचे. संघर्ष करत निधी आणला. प्रकल्प होऊ नये यासाठी विरोधकांकडून प्रयत्न होत होते. मात्र  महायुतीची सत्ता येताच खासदार नारायण राणे, माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी निधीत मागे बघितलं नाही. नवीन वास्तू मधून प्रशासन गतिमान असलं पाहिजे. जिल्ह्यातील प्रकल्पांची कामे दर्जेदार हवीत. दर्जाबाबत तडजोड केली जाणार नाही. नवीन प्रशासकीय इमारत हे तालुक्याचं मंत्रालय आहे. जनतेला योग्य न्याय व प्रश्न सुटले पाहिजेत. कारभार गतिमान व पारदर्शक असला पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. ते पुढे म्हणाले, इमारत सुसज्ज आहे, गतिमान कारभाराची जनतेला अपेक्षा आहे. महाराणा प्रतापसिंह यांच्या नावाने या ठिकाणी सभागृह आहे. निवडून येणाऱ्या प्रतिनिधींनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे असे सांगितले.

यावेळी कार्यकारी अभियंता श्री. सावंत यांनी प्रस्तावना केली. तर मुख्यकार्यकारी अधिकारी खेबूडकर, जिल्हाधिकारी पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार सूर्यकांत पाटील, गटविकास अधिकारी वालावलकर, भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, प्रमोद रावराणे, नसीर काझी, भालचंद्र साठे, दिलीप रावराणे, जयेंद्र रावराणे, अरविंद रावराणे, दिगंबर पाटील, सज्जनकाका रावराणे, प्राची तावडे, शारदा कांबळे, स्नेहलता चोरगे, सीमा नाणीवडेकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचलन व आभार संतोष टक्के यांनी मानले.

error: Content is protected !!