अंधश्रद्धा माणसांचा विवेक नष्ट करते- योगेश पाटील

चौके (प्रतिनिधी) : समाजात अजूनही अनेक अमानुष,अनिष्ट आणि अघोरी प्रथा आहेत.या प्रथांबाबत माणसांचे अज्ञान आहे. या अज्ञानातूनच माणसांच्या मनात भिती निर्माण होते. भितीमुळे माणूस अंधश्रद्धाळू बनतो.अशा अंधश्रद्धाळू लोकांचा नंतर विवेक शून्य होतो. विचार करण्याची प्रक्रिया थांबते आणि खरात सारखे भोंदूबाबा अशा लोकांची फसवणूक मोठ्या प्रमाणात करतात . यापासून सर्वसामान्य जनतेचे संरक्षण करून त्यांचे जादूटोणा करणाऱ्या भोंदूबाबा कडून होणारे शोषण आणि पिळवणूक थांबविण्यासाठी जादूटोणा विरोधी कायदा महाराष्ट्र शासनाने संमत केला . तो समजून घ्यावा स्वतःतील विवेक जागृत करून जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन आचरणात आणावा असे आवाहन योगेश पाटील यांनी केले .

सामाजिक न्यायभवन विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन व श्रीकृष्ण महिला बालकल्याण व अपंग पुनर्वसन विकास मंडळ जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध व उच्चाटन या योजने अंतर्गत जनजागृती कार्यक्रम भ.ता. च .म .मा . विद्यालय चौके हायस्कूल ता .मालवण येथे प्रशालेच्या मुख्याध्यापिका रसिका गोसावी यांच्या सहकार्यातून नुकताच संपन्न झाला . त्यावेळी ते विचार मंचावरून बोलत होते .
यावेळी त्यांच्या सोबत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्गचे जिल्हा संघटक विजय चौकेकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका रसिका गोसावी, योगेश वराडकर ,प्रशालेचे शिक्षक दत्तप्रसाद परुळेकर सर, नागेश गिरकर सर, संगिता जाधव मॅडम, दुर्वा वारंग मॅडम, अक्षता सोनवडेकर मॅडम, अनिल आचरेकर सर, विजय डगला सर,भूषण अहिराव, सचिन शिंदे आणि शालेय कर्मचारी वृंद उपस्थित होते .

यावेळी विजय चौकेकर यांनी मार्गदर्शन करताना जादूटोणा विरोधी कायदा देव धर्मा विरोधी नाही मात्र देव धर्माच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यां विरुद्धच असल्याचे सांगितले. जादूटोणा विरोधी कायद्या मधील बारा अनुसूचीच्या आधारावर जादूटोणा करणारे आणि भोंदू लोक आपल्यात अलौकिक शक्ती आहे म्हणून सांगून कसे चमत्कार करतात आणि हातचलाखी करतात याची विविध प्रात्यक्षिके संतांच्या दाखल्या सहित करून दाखविली . यामध्ये पाण्याने दिवा पेटविणे , मंत्राने अग्नी पेटविणे , गड्डयात भूत उतरविणे , नारळातून करणी काढणे , मंत्राने अगबत्तीची दिशा बदलणे , हातातून सोन्याची चैन काढणे , जिभेतून तार आरपार काढणे ,पेटता कापूर खाऊन दाखविणे , दिव्य शक्तीने नारळ अधांतरी लटकविणे, करणीने नारळ पेटविणे इत्यादी प्रात्यक्षिके सहज करून दाखविली व मूलांकडून करून घेतली . आपल्या गावात असे जर कोणी भोंदू बाबा काही चमत्कार करून दाखवित असल्यास त्याची तक्रार नजिकच्या पोलिस ठाणे येथे तात्काळ करावी असेही आवाहन विजय चौकेकर यांनी केले .

योगेश वराडकर यांनी विद्यार्थ्यांनी लिहिलेले शब्द आपल्या दिव्य शक्तीने न वाचता ओळखून दाखविले.तसेच हवेतून सोन्याची अंगठी काढून दाखविली आणि जन्मजात आपले नशिब ठरलेले असते का या विषयी सखोल माहिती दिली .शेवटी सर्व विद्यार्थी व शिक्षक यांचे कडून अंधश्रद्धा निर्मूलनाची शपथ योगेश पाटील यांनी म्हणून दाखवून म्हणून घेतली.दत्तप्रसाद परुळेकर सरांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर विजय डगला यांनी आभार मानले.

error: Content is protected !!