यथा नेता तथा कार्यकर्ता …मंत्री नितेश राणेंच्या समाजसेवेच्या पावलावर महिला बालविकास सभापतींचे पाऊल

बर्थडे सेलिब्रेशन ऐवजी सामाजिक कार्याचा सभापती अनुराधा नारकर यांचा वसा

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नितेश राणे यांनी यावर्षी आलेल्या नैसर्गिक संकटाने शेतकरी संकटात असल्यामुळे आपला वाढदिवस साजरा न करता समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संदेश आपल्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या विद्यमान महिला बालविकास सभापती अनुराधा महेश नारकर यांनी आपले नेते पालकमंत्री नितेश राणे यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्या वाढदिवशी सामाजिक कार्याचा वसा घेत आपले सभापतीपदाचे मानधन महिला आणि बालविकास संदर्भातील विशेष उपक्रमांसाठी देऊ केला आहे. गुरुवार दि.2 जुलै राेजी आपल्या वाढदिवशी सभापती साै नारकर यांनी आपला निर्णय जाहिर केला.सभापती पदाचे मानधन सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निधीत जमा करण्याची केवळ घोषणा करून सभापती अनुराधा नारकर थांबल्या नाहीत तर त्यांनी त्यानुसार प्रत्यक्ष कृतीही केली आहे.जिल्हा परिषद महिला आणि बालविकास विभागाच्या उपमुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना लेखी पत्र सादर करून आपल्या सभापतीकाळात मिळणारे सर्व मानधन नारकर यांनी जिल्हा परिषद निधीत जमा करून घेण्यासाठी आवश्यक ती सर्व प्रशासकीय कार्यवाही करण्याची सूचना केली आहे. शासकीय नियमानुसार जिल्हा परिषद महिला बालविकास सभापतीपदावरील लोकप्रतिनिधीला दरमहा 12 हजार 400 इतके मानधन मिळते. तब्बल पावणे आठ वर्षांनंतर सिंधुदुर्ग जिल्हा परिषद च्या निवडणूका झाल्या आणि त्यानंतर प्रथमच झालेल्या विषय समिती सभापतीपदी निवडीवेळी देवगड तालुक्यातील पोंभुर्ले मतदारसंघातून बिनविरोध निवडून आलेल्या अनुराधा महेश नारकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या महिला बालविकास सभापतिपदी एकमुखाने निवड करण्यात आली. सभापती पदाचा कारभार लोकभीमुख पद्धतीने हाकतानाच सभापती अनुराधा नारकर यांनी आदर्शवत निर्णय घेत आपल्या सभापतीपदाच्या कार्यकाळात रुपये 12 हजार 400 प्रमाणे दरमहा मिळणारे सर्व मानधन जिल्हा परीषद निधीत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. सभापती अनुराधा नारकर यांचा हा निर्णय म्हणजे सामाजिक बांधिलकीची जाणीव आणि नेणिव असणारा आहे. या मानधनाच्या रक्कमेतून महिला आणि बालविकास विभागाच्या विशेष उपक्रमांसाठी निधी राखून ठेवण्याच्या त्यांनी सूचना केल्या आहेत. यातून सामाजिक संवेदनशीलता आणि समाजाविषयीची नारकर यांची तळमळ अधोरेखित होते.

error: Content is protected !!