चला संविधान समजून घेऊया. जि.प. शाळा ओसरगाव नंबर 1 मध्ये मासूमचा पहिला बालमेळावा उत्साहात”

कणकवली (प्रतिनिधी) : महिला उत्कर्ष मंडळ (मासूम), पुणे यांच्या संविधान संवर्धन फेलोशिप अंतर्गत आज ओसरगाव जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ येथे विद्यार्थ्यांसाठी संविधान जागृतीवर आधारित पहिला बालमेळावा केंद्रप्रमुख पंढरीनाथ तेंडोलकर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जिवबा अपराज,मुख्याध्यापक किशोर कदम , वकील स्वाती तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन पारंपरिक दीपप्रज्वलनाऐवजी सोनचाफ्याचे कलम लावून करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या अभिनव उपक्रमामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच अर्थपूर्ण सुरुवात लाभली.

ग्रामीण भागातील महिला, मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये संविधानातील मूल्ये, हक्क आणि अधिकार यांची जाणीव निर्माण करण्यासाठी मासूम संस्था सातत्याने कार्यरत आहे. त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या बालमेळाव्याची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या ओवीच्या सामूहिक गायनाने झाली.

“चला हसत-खेळत संविधान समजून घेऊया” या संकल्पनेवर आधारित मेळाव्यात चला मैत्री करूया, आईचे पत्र हरवले, चॉकलेट खेळ तसेच विविध खेळ, गीते आणि समूह उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संविधानातील समता, समानता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, न्याय, स्वातंत्र्य, हक्क आणि कर्तव्ये यांची सहज आणि आनंददायी पद्धतीने ओळख करून देण्यात आली. सामाजिक भान, परस्पर सहकार्य आणि लोकशाही मूल्यांची रुजवण करण्याचा प्रभावी प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

मासूम संस्थेच्या फेलो प्राजक्ता नेमळेकर यांनी “असावा सुंदर समतेचा बंगला” हे प्रेरणादायी गीत सादर करून विद्यार्थ्यांना समता आणि न्याय या संविधानिक मूल्यांचे महत्त्व प्रभावीपणे समजावून सांगितले.कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला संविधानाची उद्देशिका भेट देण्यात आली. आनंद, उत्साह आणि संविधानिक मूल्यांचा संदेश देत बालमेळावा यशस्वीरित्या संपन्न झाला.
कार्यक्रमाचे उद्घाटक तथा बोर्डवे केंद्राचे केंद्रप्रमुख मा. पंढरीनाथ तेंडोलकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले, “विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून संविधानिक मूल्यांची रुजवण होणे अत्यंत आवश्यक आहे. मासूम संस्था अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, लोकशाही मूल्ये आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना विकसित करण्याचे मोलाचे कार्य करत आहे. जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ मध्ये आयोजित करण्यात आलेला हा पहिलाच बालमेळावा विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल.”

मुख्याध्यापक किशोर कदम यांनी आपल्या मनोगतात मासूम संस्थेच्या कार्याचे कौतुक करत, “संविधानातील मूल्ये विद्यार्थ्यांपर्यंत आनंददायी पद्धतीने पोहोचविणारा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून भविष्यातही अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास अधिक सक्षम होईल,” असे मत व्यक्त केले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जीवबा अपराज, बोर्डवे केंद्राचे केंद्रप्रमुख पंढरीनाथ तेंडोलकर, मुख्याध्यापक किशोर कदम, शिक्षिका प्रमिता तांबे, राजश्री तांबे, मासूम फेलो वकील स्वाती तेली,फेलो प्राजक्ता नेमळेकर, दया आजवेलकर, पालकवर्ग प्रिया जाधव,अपेक्षा चव्हाण, अर्चना तोरसकर तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणिता तांबे यांनी केले व आभार राजश्री तांबे यांनी मानले.

error: Content is protected !!