राष्ट्रीय दृष्टिहीन संस्थेमार्फत गणेशचतुर्थी निमित्त अंधबांधवांना रेशन वाटप
सावंतवाडी (प्रतिनिधी) : आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांच्यामार्फत आणि राष्ट्रीय दृष्टीहीन संघ कोकण या संस्थेच्या वतीने दिनांक २४ ऑगस्ट रोजी विठ्ठल मंदिर सावंतवाडी येथे गणेश चतुर्थी निमित्त अंध बांधवांना रेशन वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय दृष्टीहीन संघ कोकण संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गावडे, महासचिव शेखर आळवे, प्रकाश वाघ, शाम आजगावकर, नंदा सावंत, संतोष दळवी, सेजल आळवे तसेच शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर व कारिवडे गावचे पुरोहित समीर भिडे आदी उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष बाबुराव गावडे यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर महासचिव शेखर आळवे यांनी मंगेश तळवणेकर यांना शुभेच्छा दिल्या तसेच संस्थेच्या वर्धापनदिना दिवशी दिलेला शब्द पूर्ण करत १०० अंध बांधवांना रेशन वाटप केल्याबद्दल आभार मानण्यात आले.
माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांच्या हस्ते अंध बांधवांना रेशन वाटप करण्यात आले. यात साखर, तूरडाळ, तेल, गूळ, वाटाणे, अगरबत्ती यासारख्या जीवनोपयोगी वस्तूंचा समावेश होता. त्यानंतर प्रकाश वाघ यांनी संस्थेच्या वतीने मंगेश तळवळणेकर यांचे आभार मानले आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत कार्यक्रमाची सांगता झाली.










