गणपतीत नाही तर म्हाळवसात राज्य सरकारचे श्राद्ध घालायला बोट येणार काय ?
माजी आमदार परशुराम उपरकर यांची टीका
कणकवली (प्रतिनिधी) : पालकमंत्री राणेंनी घोषणा केलेली गणेशोत्सवात येणारी माझगाव ते विजयदुर्ग रोरो बोट कुठे अडकली ? असा सवाल करतानाच ही रोरो बोट गणेशचतुर्थी नंतर पितरांचे आणि राज्य सरकारचे श्राद्ध घालायला म्हाळवसात येणार काय ? असा बोचरा सवाल शिवसेना माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला. पालकमंत्री नितेश राणे यांनी नॅशनल हायवे खड्डेमुक्त करण्याची केलेली घोषणा हवेतच विरली. जिल्ह्यात शासकीय 87 डॉक्टर आणल्याचे सांगत पालकमंत्र्यांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली खरी पण हे सर्व डॉक्टर शिकाऊ आहेत. आजही दरदिवशी 4 ते 5 गंभीर आजारग्रस्त रुग्ण गोवा बांबुळी येथे रेफर केले जातात. जनतेने निवडून दिलेले खासदार नारायण राणे राहिले कुठे ? चिपी विमानतळावरून उडणारे विमान गेले कुठे ? असा सवालही उपरकर यांनी केला. आनंदाचा शिधा सरकारने बंद केला. लाडकी बहीण योजनेचे निकष कडक करून लाभार्थी बाद केले जात आहेत. शेतपिकाच्या नुकसानीचे पंचनामे होत नाहीत. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळत नाही. नरडवे धरणग्रस्तांना भूखंड वाटप करण्याच्या नावाखाली स्वतःला मलिदा मिळवण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे आल्याची टीकाही उपरकर यांनी केली.










