चला ग सख्यानो, बिगीss बिगीsss हरितालिका पुजूया

गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला, फोंडाघाट मध्ये हरितालिका पूजनाची, महिलांमध्ये एकच लगबग

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट गावामध्ये गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असताना, विघ्नहर्ताच्या आगमनापूर्वी पूर्वसंध्याला, पंचक्रोशीतील वाडी-वाडी वर श्रीहरितालिका पूजन आणि व्रत मनोभावे, श्रद्धेने उत्साहात संपन्न झाले. सुहासिनी आणि नवीनच व्रत धारण केलेल्या कुमारिकांमध्ये मोठी लगबग पहावयास मिळाली. वाड्यावाड्यांवर बऱ्याच ठिकाणी हरितालिका पूजनाचा एकत्र मांड असतो. या ठिकाणी वाडी मधील आजूबाजूच्या महिला एकत्र येतात. यजमान पूजेनंतर सर्व महिला पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली यथासांग पूजा करून, आपले सांगणे हरितालिकेकडे मांडतात. त्या इच्छा पूर्ण होतात, अशी शास्त्राप्रमाणे प्रत्येकीची श्रद्धा असते.

विशेषता हे व्रत विवाहित महिला त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखीसमृद्ध वैवाहिक जीवनासाठी तर अविवाहित मुली-कुमारीका त्यांना इच्छित जोडीदार मिळण्यासाठी करतात. भाद्रपद शुक्ल तृतीयेला हे व्रत शिवपार्वतीच्या अढळ प्रेमाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे त्या दिवशी इच्छित प्राप्तीसाठी महिला-कुमारिका शिवपार्वतीची पूजा करतात. या पूजेला निसर्गाने श्रावण महिन्यात भरभरून दिलेली फुला ची पत्री आणि फुलांची आरास वाहिली जाते. त्या सणाला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असते. महिलांचे एकत्र येणे, पारंपारिक हास्यविनोद, खेळ आणि गुजगोष्टी यामुळे येणारा सण आनंदी, उत्साही होतो. त्यामुळे पुरोहिताची उपलब्धता, त्यांची घाई पूजेसाठी दिसून येते त्यामुळे परिसरात नटून-थटून सौभाग्यलंकार लेऊन मांडावर जाण्यासाठी महिलांमध्ये एकच उत्साह दिसून येत आहे.

error: Content is protected !!