मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या सफिकुलचं ‘संविता आश्रम’मधून कुटुंबाशी हृदयस्पर्शी पुनर्मिलन
१२ वर्षांनी घरचा रस्ता सापडला…
गुगल सर्च च्या सहाय्याने झाले मानसिक रूग्ण युवकाचे कुटुंबाशी पुनर्मिलन
खारेपाटण (प्रतिनिधी) : पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील सफिकुल इस्लाम उर्फ रोज या मानसिक आजाराने त्रस्त तरुणाचे तब्बल १२ वर्षांनी आपल्या कुटुंबाशी हृदयस्पर्शी पुनर्मिलन झाले आहे. संविता आश्रम,पणदूर (ता. कुडाळ) येथे राहणाऱ्या या तरुणाचा आपल्या कुटुंबियांशी १२ वर्षानंतर व्हिडिओ कॉलवर पहिला संवाद झाला,तेव्हा उपस्थित सगळ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले. तर जीवन आनंद संस्थेचे अध्यक्ष संदिप परब यांनी गुगल यंत्रणेचे मन:पूर्वक आभार मानले आहे. याबाबत अधिक वृत्त असे की, १२ वर्षांपूर्वी,मानसिक अस्थैर्याच्या अवस्थेत सफिकुल पश्चिम बंगाल मधील आपल्या गावातून – मुक्काम हरिसपूर, पोस्ट भिमपूर,तालुका मुराराई II ,जिल्हा बीरभूम येथून हरवला होता.अनेक वर्षं कुठे राहिला, कसा राहिला याचा पत्ता नव्हता. पाच महिन्यांपूर्वी त्यास कुडाळ पोलीस स्टेशनच्या मदतीने जीवन आनंद संस्थेच्या पणदूर, ता.कुडाळ येथील ‘संविता आश्रम’मध्ये त्याला दाखल करण्यात आले होते. तिथून पुढची गोष्ट म्हणजे श्रद्धा, सेवा,आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जुळलेली शृंखला.
संस्थेचे विश्वस्त किसन चौरे यांनी सलग पाच महिने त्याच्याशी प्रेमाने संवाद साधत त्याचे मूळ शोधण्याचा प्रयत्न केला. बंगाली भाषेतील त्याच्या हळू, अस्पष्ट संवादातून धागेदोरे मिळवत, त्यांनी गुगलच्या सहाय्याने त्याचे गाव, जिल्हा आणि कुटुंबीय शोधून काढले.
या शोध मोहीमेत बीरभूम जिल्हा नियंत्रण कक्षासह पायकोर, इलामबाजार, मुराराई पोलीस स्टेशन व स्थानिक ग्रामपंचायत प्रतिनिधींनीसह संविता आश्रमातील देवु सावंत, विजया व आशिष कांबळी , निशा चव्हाण, सोनाली साटम व आश्रमाचे सेवा कार्यकर्त्यांनी अत्यंत मोलाची मदत केली.आणि अखेर… एक दिवस असा उजाडला, जेव्हा सफिकुलचा आपल्या भावाशी व्हिडिओ कॉलद्वारे पहिला संवाद झाला. त्याचा भाऊ अजहारूल इस्लाम उर्फ राणा आणि एक नातलग खास पश्चिम बंगालहून आले आणि त्यांनी त्याला आपल्या ताब्यात घेतले. आश्रमातील सर्व सेवकांच्या उपस्थितीत हे भावनिक पुनर्मिलन घडले. संविता आश्रम आणि जीवन आनंद संस्थेच्या सेवाभावी कार्याची ही एक जिवंत साक्ष आहे – जिथे माणुसकीच्या नात्यांना प्रेम, संयम आणि तंत्रज्ञान यांची साथ लाभते.ही घटना केवळ एका कुटुंबाच्या पुनर्मिलनाची नाही, तर सेवाभाव, चिकाटी आणि निखळ माणुसकीच्या विजयाची आहे.











