
खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पुरळ या गावचे सुपुत्र तथा एकजूट लेणी अभ्यास प्रचार समूह, महाराष्ट्र राज्य सदस्य व लेणी संवाद चे कार्यकर्ते प्रफुल्ल पुरळकर यांनी भारतातील १०० लेण्या पाहण्याचा पहिला टप्पा दि २७ ऑगस्ट, २०२५ रोजी अलिबाग चौल येथील वाघजाई व हिंगलाज लेणी पाहून पूर्ण केला आहे. त्यांच्या या सामाजिक व ऐतिहासिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.
या १०० लेण्यांमध्ये परिचित व अपरिचित अशा लेण्यांचा समावेश आहे. तर २६ ऑगस्ट, २०१८ पासून त्यांनी देशभरातील लेण्याची पाहणी करून अभ्यास करायला सुरुवात केली. यामध्ये त्यांनी महाराष्ट्र, बिहार, मध्यप्रदेश, गोवा या राज्यातील बौद्ध लेण्याची पाहणी केली. तर त्यांच्या एकजूट लेणी अभ्यास प्रचार समूहांच्या सदस्यांसोबत त्यांनी भ्रमंती करून विविध लेण्यांना भेटी दिल्या आहेत. या १०० लेण्यांपैकी त्यांनी ३६ लेण्यांवर लेख लिहून ते सोशल व प्रिंट मीडियामध्ये देखील प्रकाशित केले आहेत.
तसेच प्रफुल्ल पूरळकर यांनी देशभरातील जवळपास ९५ लेण्यांचे फोटोग्राफ काढून त्याचा एक स्वतंत्र अल्बम बनवून त्यांनी तो पिडीएफ च्या माध्यमातून सोशल मीडियावर प्रकाशित सुद्धा केला आहे. त्यांच्या या यशामागे त्यांच्यासोबत नेहमी लेण्यांवर येणारी त्यांची मित्र मंडळी त्यामध्ये खासकरून एकजूट लेणी चे प्रमुख सारिश डोळस (दादूस) यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. तसेच दिवं. रामचंद्र सकपाळ, दिवं. प्रा. डॉ. जयपाल कठारे व नागवंशी नंदकुमार कासारे यांचे सुरवातीला मार्गदर्शन लाभले होते. त्यांच्या कामाचा गौरव म्हणून त्यांना नुकताच “लेणी संवर्धक पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले आहे.
तर गेल्या वर्षांपासून त्यांनी लेणी संवाद च्या माध्यमातून अपरिचित लेण्यांबद्दल विविध ठिकाणी व्याख्यान देण्यास देखील सुरवात केली असून पुढील टप्पा म्हणून यानंतर त्यांच्या आणखी १०० लेण्या ज्या गड – किल्ल्यांवर दुर्लक्षित आहेत त्या पाहण्याचा त्यांचा संकल्प असल्याचे श्री प्रफुल्ल पूरळकर यांनी यांनी सांगितले आहे.













