वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था ही सर्वसामान्यांची पतसंस्था आहे. संस्थेचे अधिकृत भाग भांडवल एक कोटी असून चालू वर्षी त्यात पाच लाख तेहतीस हजार पाचशे सत्तर रुपयांनी वाढ होऊन 31 मार्च, 2025 अखेर सभासद भांडवल 77 लाख 27 हजार 920 रुपये इतके झाले आहे. यामध्ये संस्था अल्पबचत ठेव मुदत ठेव संचित ठेव या रकमेतून आपल्या सभासदांना कर्ज वाटप करीत आहे. कर्जदारांनी घेतलेले कर्ज वेळी परतफेड करून पतसंस्थेच्या प्रगतीत हातभार लावावा असे आवाहन चेअरमन शांताराम रावराणे यांनी केले.
वैभववाडी तालुका ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेची सर्वसाधारण वार्षिक सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक भवन वैभववाडी येथे पार पडली. यावेळी रावराणे मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, माजी सभापती जयेंद्र रावराणे, सज्जन रावराणे, डॉ. राजेंद्र पाताडे, संजय सावंत, संजय रावराणे, तेजस आंबेकर, रोहन रावराणे, आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना चेअरमन रावराणे पुढे म्हणाले, कर्जदाराने आपण घेतलेले कर्ज वेळीच परतफेड केली तर अन्य गरजूंना कर्ज वाटप करता येते. त्याचप्रमाणे त्याची पतही बाजारात कायम राहते. आपली पत कायम राहणे ती टिकवणे हे खूप महत्त्वाचे आहे. पारदर्शक व आर्थिक शिस्त यामुळेच पतसंस्था आज यशाच्या शिखरावर पोहोचलेली आपल्याला दिसत आहे. यामध्ये आपल्या सर्वांचे मोठे योगदान आहे. असेच सहकार्य कायम राहूदे असे आवाहन त्यांनी सर्वांना केले. सहकारातील तज्ज्ञ घाडगे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पतसंस्थेचे सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.











