‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानांतर्गत कणकवली येथे मोफत वैद्यकीय व दंतरोग शिबिराचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनामार्फत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” अभियानांतर्गत सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. याअंतर्गत वैद्यकीय व दंतरोग तपासणी शिबिराचे आयोजन उपजिल्हा रुग्णालय, कणकवली येथे करण्यात आले आहे. हे शिबिर दिनांक २९ सप्टेंबर, २०२५ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० या वेळेत होणार आहे. या शिबिरासाठी नागरिकांना आधारकार्ड व आधार लिंक मोबाईल सोबत आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या शिबिरात खालील उपक्रम राबविले जाणार आहेत. यात सर्व महिलांसाठी तपासणी आणि आरोग्य सेवा दिल्या जाणार असून यात रक्तदाब, मधुमेह, नेत्र व दंत रोग तपासणी, हृदयविकार तपासणी, स्तन व गर्भाशय मुख कर्करोग तपासणी, गरोदर महिलांसाठी प्रसूतीपूर्व तपासणी, लसीकरण सेवा, रक्त व हिमोग्लोबीन तपासणी, क्षयरोग तपासणी, सिकसेल आजार व रक्तक्षय तपासणी, विशेष तज्ज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन. त्यासोबतच आरोग्य सेवा देणे सोपे करण्यासाठी माता व बालसुरक्षा कार्ड, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना नोंदणी, आयुष्यमान वय वंदना कार्ड, सिकलसेल कार्ड, पोषण ट्रॅकर मध्ये लाभार्थी नोंदणी यांसारख्या सेवा देखील देण्यात येणार आहेत. नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी अवयव दान नोंदणी, आभा कार्ड नोंदणी, सिकलसेल तसेच इतर आजारांबाबत समुपदेशन व मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.

या शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून, मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून मोफत तपासणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!