तरुण पिढीने सहकारात उतरावे; रोजगार निर्मितीची मोठी संधी – पालकमंत्री नितेश राणे

शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय निर्माण करावा – जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी

सिंधू वैभव फार्मर प्रोड्युसर कंपनीकडून पाचशे शेतकऱ्यांना शेअर प्रमाणपत्रांचे वाटप

वैभववाडी (प्रतिनिधी) : कोकणात आर्थिक समृद्धी आणायची असेल तर सहकार हे प्रभावी माध्यम आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रमाणे जिल्ह्यात सहकाराचे जाळे निर्माण झाले पाहिजे. यासाठी आपण इतर देश राज्यांचा अभ्यास करून मोठमोठ्या प्रकल्पाचे प्रस्ताव तयार केले पाहिजेत. राज्यात व केंद्रात आमची सत्ता आहे. विकासासाठी पोषक वातावरण आहे. या संधी फायदा घेऊन शेती व शेतीला पूरक उद्योगधंदे निर्माण करा. यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.

वैभववाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ यांच्यावतीने आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी येथील सभागृहात आयोजित सहकार मेळाव्यात पालकमंत्री राणे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, संचालक दिलीप रावराणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष तुळशीदास रावराणे, जिल्हा उपनिबंधक बाळ परब, चेअरमन प्रमोद रावराणे, व्हाईस चेअरमन अंबाजी हुंबे, नाशिर काझी, सुधीर नकाशे, भालचंद्र साठे, जयेंद रावराणे, अरविंद रावराणे, दिगंबर पाटील, सीमा नानवडेकर, श्रद्धा रावराणे, प्राची तावडे, स्नेहलता चोरगे, शारदा कांबळे, सज्जनकाका रावराणे, शांताराम रावराणे, संभाजी रावराणे, विजय रावराणे, बाळा हरियाण, काँग्रेस तालुकाध्यक्ष भालचंद्र जाधव ,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष वैभव रावराणे यांच्यासह सर्व सोसायटी चेअरमन, सहकारात काम करणारे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री राणे पुढे म्हणाले, आपली वैभववाडी ही नेहमीच सर्वच बाबतीत सर्वांच्या पुढे असते. जिल्ह्याची सहकार्याची सुरुवात ही वैभववाडीतूनच झाली आहे. विकास व सहकारासाठी सध्याचा काळ हा चांगला काळ आहे. राज्यात व केंद्रात आमची सत्ता आहे. याचा फायदा सर्वांनी करून घ्यावा. तुम्हाला लागेल ते सहकार्य करण्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.

कोकणातील तरुण पिढी ही सहकाराकडे येताना दिसत नाही. याउलट पश्चिम महाराष्ट्रातील तरुण मुले हे या क्षेत्राकडे आकर्षित झालेले दिसतात. यातून त्यांनी आपली प्रगती साधली आहे. या क्षेत्रात मोठी रोजगाराची संधी आहे. युवक आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याची ताकद सहकारात आहे. तिचा वापर करून तरुणांनी स्वतःची प्रगती करावी.

ए. आय. हे तंत्रज्ञान वापरणारा सिंधुदुर्ग हा राज्यातील पहिला जिल्हा आहे. या तंत्रज्ञानाचा वापर सहकार, बँकिंग क्षेत्रात सुद्धा सुरू झाला आहे. तसेच शेतीमध्ये ए. आय. तंत्राचा वापर केल्यास निसर्गाच्या लहरीपणावर मात करून शेतीचे उत्पन्न घेता येईल. यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आमची राहील असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

तर जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी म्हणाले, शेती करत असताना शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय करायला हवा. जेणेकरून निसर्गाच्या लहरीपणावर आपल्याला मात करता येईल. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते त्यामुळे शेतकरी शेतीकडे पाठ फिरवत आहेत. यासाठी शेतीपूरक व्यवसाय निर्माण होणे आवश्यक आहे. सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करता येणार आहे. जिल्ह्यात जिल्हा बँकेच्या माध्यमातून अनेक संस्था उभ्या करून त्यातून शेतकऱ्यांना हातभार लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. बाजार समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला योग्य बाजारभाव मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. जिल्ह्यातील काजूला बाजार भाव मिळावा यासाठी पालकमंत्र्यांनी पाठपुरावा करून यावर्षी काजूला चांगला भाव मिळवून देण्यात यश मिळाले आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच केंद्र सरकारने सहकार मंत्रालयाची स्थापना केली आहे. त्यामुळे शासकीय योजनांचे सहकार्य व पाठबळ सहकाराला मिळत आहे. प्रत्येक संस्था संगणीकृत करण्यासाठी शासनाकडून निधी प्राप्त होत आहे. यातून बँकांप्रमाणेच विकास संस्थांचा कारभार अतिशय पारदर्शक होणार आहे. राज्यकर्ते म्हणून काम करत असताना प्रत्येकाच्या घरात सुख समृद्धी आणण्याची आमची जबाबदारी आहे. यासाठी नवनवीन उद्योग धंदे व्यावसाय निर्माण केले पाहिजेत. जिल्ह्यात सहकार क्षेत्राला मोठी संधी आहे. या सहकारामध्ये तरुण, महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला पाहिजे. सहकाराला उज्वल भवितव्य आहे. वैभववाडी तालुक्याला या सहकाराचा वारसा लाभला आहे. त्याचा वापर करून तालुका समृद्ध करा, असे आवाहन दळवी यांनी केले. यावेळी सिंधू वैभव फार्मर प्रोडूसर कंपनी या कंपनीने तालुक्यातील पाचशे शेतकऱ्यांना प्रत्येकी एक हजार रुपयाचा शेअर्स सर्टिफिकेट वाटप करण्याची घोषणा करण्यात आली तसेच प्राथमिक स्वरूपात काही शेतकऱ्यांना ही सर्टिफिकेट वितरित करण्यात आली.

error: Content is protected !!