कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका काँग्रेस कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे माजी पंतप्रधान स्व. लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, अनिल डेगवेकर, प्रविण वरुणकर, अजय मोरये, निलेश मालंडकर, प्रदीपकुमार जाधव, महेश तेली, राजू वर्णे, गौरी तेली, लाॅरेंस डिसोझा, संतोष तेली आदी कार्यकर्ते हजर होते.
यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी राजकारणाबाहेरचे गांधींबद्दल सांगितले. १९२५ साली गांधीजींनी चरखा संघ स्थापन केला आणि ५० हजार चरखे घराघरात फिरू लागले. सुमारे ५० हजार सूत कामगार १५०० गावांमधून काम करू लागले. याशिवाय विणकर, छपाई कामगार, रंग लावणारी माणसं आणि शिंपी सर्वांनाच काम मिळालं. टकळ्या आणि चरखे तयार करण्याचं काम गावातल्या लोहारांना मिळालं. पुढच्या पाच वर्षांत खादीचं उत्पादन आणि विक्री वाढली. एक लाखाहून अधिक सूत कामगारांना काम मिळालं.
संपत्ती, पदवी, उच्च जात पाहून वधू-वरांचा निर्णय ठरावा हे गांधीजींना मान्य नव्हतं. तरुण-तरुणीची प्रकृती, चारित्र्य आणि श्रम करण्याची क्षमता यांना ते महत्त्व देत. ज्या विवाहास गांधीजी पुरोहित असत, त्यात वधू-वर हातानं कातलेल्या सूताची, हाताने विणलेल्या खादीची वस्त्र परिधान करत आणि हाताने कातलेल्या सूताच्या हारांखेरीज कुठलाही दागिना त्यांच्या अंगावर नसे. विवाह विधीदेखील अत्यंत साधा असे. होमकुंडासमोर वर-वधू आपआपल्या सूताचे हार एकमेकांना घालत आणि वैदिक मंत्र म्हणत. वराला किंमती भेटी किंवा हुंडा दिला जात नसे. गांधीजींना लग्नातला डामडौल, जेवणावळी सगळंच नापसंत होतं. त्यांना वाटे, की धार्मिक कार्यक्रमात १० रुपयांपेक्षा जास्त खर्च करू नये.
जे शेतकरी लग्नासाठी वा श्राद्धासाठी कर्जबाजारी होत त्यांना ते म्हणत – मी तुमचा पुरोहित होतो. श्राद्ध वा लग्न करायला फार पैसा लागत नाही. लोक ज्याला श्राद्ध म्हणतात त्यावर त्यांचा विश्वास नव्हता. त्यांच्यामते वाडवडिलांचं श्राद्ध करण्याचा एकमेव चांगला मार्ग म्हणजे, त्यांचे गुण आपल्यात आणण्याचा प्रयत्न करणं. तुरुंगातल्या कष्टांनी गांधीजींच्या मनात कधीही कटुता निर्माण झाली नाही. तुरुंगवासानंतर त्यांचं मन अधिक समृद्ध आणि संतुलित झालेलं असे. ते तुरुंगात उर्दू शिकले, संस्कृत, तमीळ, हिंदी, गुजराथी आणि इंग्रजी पुस्तकं वाचली. ६५ व्या वर्षी त्यांनी एका कैदी मित्राकडून खगोलशास्त्र शिकायला सुरुवात केली. तार्यांचा अभ्यास करण्यासाठी तुरुंगाच्या अधिकार्य़ांकडून दुर्बीण मिळवली.
जनतेची सेवा करायची तर गरीबीचं व्रत घेतलं पाहिजे, अशी गांधीजींची धारणा होती. त्यांनी वाडवडिलार्जित मालमत्तेवरचा हक्क सोडला. आपले आयुर्विम्याचे हप्ते बंद केले. दक्षिण आफ्रिकेत त्यांना भेट मिळालेल्या किंमती वस्तू – सोनं, चांदी, हिरे आणि फिनिक्स आश्रमाच्या विक्रीतून आलेले पैसे ह्या सर्वांचा सार्वजनिक कामासाठी ट्रस्ट निर्माण केला. त्यांनी स्वतः जीवनातली सुरक्षितता नाकारली आणि स्वतःची पत्नी, मुलगे आणि नातेवाईकांनाही कठोरपणे नाकारायला लावली. दर आठवड्याला आश्रमातल्या मुलांना ते सुंदर पत्रं पाठवत. एका पत्रात ते म्हणतात – जर तुम्ही पंखांशिवाय उडायला शिकलात तर, तुमचे सगळे त्रास नाहीसे होतील. मला पंख नाहीत तरी मी मनातल्या मनात रोज उडत उडत तुमच्याकडे येतो. ही काय छोटी विमला आणि हा बघा हरी.
यावेळी स्व. लालबहादूर शास्त्री यांच्याही कार्यांचा उल्लेख केला. जय जवान जय किसान या त्यांचा घोषणेनंतर देशात उर्जा आली त्यांनी नेहरुंनंतर देश सांभाळला. पंतप्रधान असताना त्यांनी स्वतः शेती करुन एक आदर्श निर्माण केला. त्यांच्या साधेपणाची आठवण काढण्यात आली. यावेळेस अनिल डेगवेकर, प्रविण वरुणकर यांनीही आपले विचार मांडले.












